स्टेशन परिसराने घेतला मोकळा श्वास
By Admin | Updated: May 13, 2017 00:52 IST2017-05-13T00:52:46+5:302017-05-13T00:52:46+5:30
गावदेवी भागातील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर आणि येथील दुकानांचे गाळे तोडल्यानंतर शुक्रवारी स्टेशन परिसर, सॅटीस, गोखले रोड

स्टेशन परिसराने घेतला मोकळा श्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गावदेवी भागातील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर आणि येथील दुकानांचे गाळे तोडल्यानंतर शुक्रवारी स्टेशन परिसर, सॅटीस, गोखले रोड आणि गावदेवी परिसराने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले. परंतु, रिक्षाचालकांची मुजोरी मात्र शुक्रवारी पुन्हा पाहावयास मिळाली.
बुधवारी संध्याकाळी गावदेवी परिसरात कारवाई करायला गेलेले महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना फेरीवाल्यांकडून जबर मारहाण झाल्यानंतर याची गंभीर दखल पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतली आहे. पालिका अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्याच्या दृष्टीनेच माळवी यांच्यावर पूर्वनियोजित हल्ला असून तो प्रशासनावरच असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर, गुरुवारी सायंकाळी येथील दुकानदारांना कोणत्याही प्रकारची नोटीस व पूर्वसूचना न देता २७ दुकानांवर पालिकेने बेछूट हातोडा टाकला. त्यानंतर, त्यांनी गावदेवी, स्टेशन परिसर, सॅटीस, जांभळीनाका असा दौरा केला. या वेळी त्यांनी मुजोर रिक्षाचालकांना प्रसाद दिला.
दरम्यान, स्टेशन परिसरातील रस्ता रुंदीकरण केल्यानंतर या भागातून टीएमटी आणि एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. असे असतानादेखील या भागात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले होते. वारंवार कारवाई करूनही ते पुन्हा जैसे थे असेच दिसून आले. फेरीवाल्यांविरोधात व्यापाऱ्यांनीही पाठपुरावा केला होता. त्यानंतर, या भागातील अतिक्रमण विभागाची गस्त वाढवली होती. तसेच या भागावर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहील, असेही सांगण्यात आले होते. परंतु, हा कॅमेरा काही लागलाच नाही. त्यात फेरीवाल्यांच्या वाढत्या प्रस्थाविरोधात आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी, या उद्देशाने स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी पालिकेला खुले आव्हान देऊन फेरीवाले हटवा एक लाखाचे बक्षीस मिळवा, असे जाहीर केले होते. त्यानंतर, पालिकेने ही कारवाई अतिशय तीव्र करून येथील फेरीवाले हटवण्यास सुरुवात केली. आयुक्त स्वत: रस्त्यावर उतरल्याने आता या भागातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. परंतु, स्टेशन परिसरातील रिक्षाचालकांनी मुजोरी मात्र अद्यापही कमी झालेली नाही. गुरुवारी पालिका आयुक्तांची या भागात कारवाई सुरू असताना छायाचित्रणासाठी गेलेल्या काही छायाचित्रकारांवर धाव घेऊन त्यांनी शिवीगाळही केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या मुजोर रिक्षाचालकांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने निषेध केला आहे.
दुसरीकडे शुक्रवारी फेरीवाले तुरळक दिसत होते. मुजोर रिक्षाचालक मात्र पुन्हा आपले बस्तान मांडून होते.