फेरीवाल्यांवर कारवाई करा, एक लाखाचे बक्षीस मिळवा
By Admin | Updated: May 5, 2017 05:44 IST2017-05-05T05:44:41+5:302017-05-05T05:44:41+5:30
मुंब्रा परिसरातील फेरीवाले हटवा आणि एक लाख इनाम घ्या, अशी घोषणा नुकतीच ऋ ता आव्हाड यांनी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत

फेरीवाल्यांवर कारवाई करा, एक लाखाचे बक्षीस मिळवा
ठाणे : मुंब्रा परिसरातील फेरीवाले हटवा आणि एक लाख इनाम घ्या, अशी घोषणा नुकतीच ऋ ता आव्हाड यांनी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत असतानाच, स्टेशन परिसर, नौपाडा आणि गोखले रोडवरील फेरीवाले हटवा आणि पालिका अधिकाऱ्यांनो एक लाखांचे बक्षीस मिळवा, अशी योजना स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे आतातरी फेरीवाल्यांवर कारवाई होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंब्य्रातील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी ऋ ता आव्हाड यांनी अशाच प्रकारची घोषणा केली होती. त्यानंतर, आता स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी वाघुले यांनी पावले उचलली आहेत. ठाणे स्टेशन परिसरात रस्ता रुंदीकरण केले आहे. तसेच दादा पाटीलवाडी भागातून वाहने जात असल्याने येथेदेखील फेरीवाले हटवण्यात आले होते. गोखले रोडवरही अशीच काहीशी परिस्थिती होती. परंतु, पालिकेने येथील फेरीवाल्यांवर थातूरमातूर कारवाई केल्यानंतर पुन्हा त्यांचे बस्तान बसत असल्याचे चित्र आहे. सॅटीसच्या खालून तर चालणे दुरापास्त होत आहे. स्टेशन परिसर तर ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तरीदेखील या भागात त्यांचे प्रस्थ वाढलेलेच दिसून आले आहे. त्यांच्यावर कारवाई करून हा परिसर पादचाऱ्यांसाठी खुला करावा, यासाठी स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी पालिका अधिकाऱ्यांना संबंधित विभागाला पत्र दिले होते. परंतु, तरीदेखील कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानुसार, त्यांनी पुन्हा पाच वेळा स्मरणपत्रही दिले आहे. परंतु, तरीदेखील येथील फेरीवाल्यांवर कारवाई होताना दिसत नाही.
दरम्यान, येथील फेरीवाल्यांवर वॉच ठेवण्यासाठी पालिका ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेणार होती. परंतु, त्याचे पुढे काय झाले, याची माहिती अद्यापही उपलब्ध नाही. (प्रतिनिधी)
कारवाई होत नसल्याने योजना
एकूणच आता येथील फेरीवाल्यांवर कारवाई करून येथील रस्ता पादचाऱ्यांसाठी खुला करण्यासाठी वाघुले यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करा आणि एक लाखाचे बक्षीस मिळवा, अशी योजना अधिकाऱ्यांसाठी आणली आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने अशी योजना पुढे आणावी लागत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यामुळे आता पालिका यासंदर्भात काय कारवाई करणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.