ठाणे : वर्तकनगर-भीमनगर भागातील एका सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर अनिल गाडेकर (२७) या सफाई कामगाराचा खून केल्याची घटना सोमवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अनोळखी मारेक-यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोखरण रोड क्रमांक-२ भागातील रेप्टाकोर्स कंपनीमध्ये अनिल हा सफाई कामगार आहे. तो रविवारी रात्री ९.३० वा.च्या सुमारास दारूच्या नशेतच भीमनगर येथील त्याच्या घरी परतला होता. त्यानंतर, थेट पहाटे ४ वा.च्या सुमारास तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे परिसरातील काही महिलांनी त्याची बहीण मनीषा वाघमारे (२०) आणि आई कौशल्या गाडेकर (६०) यांना सांगितले. या दोघींनीही तिकडे धाव घेतली. त्यावेळी सार्वजनिक गणपती मंडपासमोरील मोकळ्या जागेत तो पडल्याचे आढळले. त्याच्या गळ्यावर वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही झाला होता. हा प्रकार ९ सप्टेंबर रोजी रात्री १० ते १० सप्टेंबर रोजी पहाटे ४ च्या दरम्यान घडला. त्याला पोलिसांच्या मदतीने तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, रक्तस्त्रावामुळे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी आणि कोणी केली, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी परिसरातील अनेकांची चौकशी केली असून मारेक-यांचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी सांगितले.घटनास्थळी वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त महादेव भोर तसेच गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिका-यांनीही भेट देऊन पाहणी केली. वर्तकनगर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यात सफाई कामगाराचा खून करुन मारेकरी पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 21:58 IST
भीमनगर भागातील एका सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर अनिल गाडेकर या सफाई कामगाराचा खून केल्याची घटना सोमवारी पहाटेच्या दरम्यान घडली. हा खून कोणी आणि का केला? याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्यात सफाई कामगाराचा खून करुन मारेकरी पसार
ठळक मुद्देवर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हानशेमध्येच वाद झाल्याचा संशय मारेकऱ्यांचा शोध सुरु