क्रीडासंकुलातील तरणतलाव अखेर खुला
By Admin | Updated: April 24, 2017 23:53 IST2017-04-24T23:53:51+5:302017-04-24T23:53:51+5:30
शहरातील एमआयडीसी परिसरातील महापालिकेच्या क्रीडासंकुलात असलेल्या तरणतलावाच्या तात्पुरत्या डागडुजीचे काम रविवारी रात्री पूर्ण झाले.

क्रीडासंकुलातील तरणतलाव अखेर खुला
डोंबिवली : शहरातील एमआयडीसी परिसरातील महापालिकेच्या क्रीडासंकुलात असलेल्या तरणतलावाच्या तात्पुरत्या डागडुजीचे काम रविवारी रात्री पूर्ण झाले. त्यामुळे तो सोमवारी सकाळी ६.३० वाजल्यापासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला.
महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी तलावाची पाहणी करत नागरिकांसमवेत पोहण्याचा आनंद लुटला. तरणतलावात सध्या केलेली कामे समाधानकारक आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका नाही, असे तरणतलावाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ऐन उन्हाळ्याच्या सुटीच्या दिवसांत तलाव बंद असल्याने मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी कोरड्या तलावात पोहण्याची महापौर चषक स्पर्धा भरवली होती. त्याची धडकी घेत ही काम झाले आहे, असा दावा मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केला. त्यावर, काम रविवारीच होणार होते, हे मनसेलाही माहिती होते. पण, तरीही केवळ स्टंट करायचा आणि न केलेल्या कामांचे श्रेय घ्यायचे, ही मनसेची सवय आजची नाही. ती जुनीच आहे, असे सांगत मोरे यांनी मनसेवर टीका केली. ते पुढे म्हणाले की, जनतेला सर्व काही माहिती आहे, म्हणूनच तर जनतेने त्यांना निवडणुकीत नाकारले होते. तरीही, त्यांची सवय गेलेली नाही. वास्तव न स्वीकारता नागरिकांची दिशाभूल करायची आणि प्रसिद्धी मिळवायची, ही तर मनसेची जुनी स्टाइल आहे. (प्रतिनिधी)