स्वा. सावरकर साहित्य संमेलनाध्यक्षपदी रमेश पतंगे
By Admin | Updated: March 21, 2017 01:54 IST2017-03-21T01:54:51+5:302017-03-21T01:54:51+5:30
ग्रंथदिंडी, परिसंवाद, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रमांनी एकोणतिसावे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन २१ ते २३ एप्रिलदरम्यान

स्वा. सावरकर साहित्य संमेलनाध्यक्षपदी रमेश पतंगे
ठाणे : ग्रंथदिंडी, परिसंवाद, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रमांनी एकोणतिसावे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन २१ ते २३ एप्रिलदरम्यान ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रंगणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सामाजिक, साहित्यिक आणि राष्ट्रनिष्ठेशी निगडित विचार आणि विश्व या संमेलनाच्या माध्यमातून उलगडले जाणार आहे. राजकीय आणि सामाजिक चळवळीचे अभ्यासक रमेश पतंगे यांची या संमेलनाध्यक्षपदी निवड झाली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई आणि स्वा. वि.दा. सावरकर प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने हे संमेलन यंदा ठाण्यात आयोजिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हे साहित्य संमेलन आयोजिले जाते. यंदाचे वर्ष सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षात ठाण्यात होऊ घातलेल्या एकोणतिसाव्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून ठाणे जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे यांची निवड झाली आहे, अशी माहिती अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकर गोखले यांनी दिली. संमेलनाची सुरुवात २१ एप्रिलला सायंकाळी ४ ते ५ या वेळेत ग्रंथदिंडीच्या माध्यमातून होणार आहे. ५ ते ७ या वेळेत मुख्य उद्घाटन सोहळा पार पडेल. तीन दिवसांत ४ परिसंवाद, २ भाषणे आणि २ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ‘भारताची सर्वांगीण संरक्षण सिद्धता’, ‘गेल्या १०० वर्षांत देशात सामाजिक सुधारणांचे झालेले प्रयत्न’, ‘सावरकरांवरील आक्षेप व त्याचे निराकरण’ आणि ‘सावरकरांची साहित्यसंपदा’ या चार विषयांवर परिसंवाद होणार आहेत. तर, ‘न उमगलेले सावरकर’ आणि ‘आजच्या संदर्भात सावरकर’ या विषयावर शंतनू विखे आणि विक्रम हेडगे हे भाषण करणार आहेत. तर, २३ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता या संमेलनाचा समारोप कार्यक्रम होईल. या संमेलनात देशभरातून सावरकरप्रेमींसह विविध संस्था सहभागी होतील. (प्रतिनिधी)