प्रभाग अधिकाऱ्याचे निलंबन?
By Admin | Updated: September 1, 2016 03:03 IST2016-09-01T03:03:35+5:302016-09-01T03:03:35+5:30
शिवाजी चौक ते महात्मा फुले चौकादरम्यान केडीएमसीने रस्ता रुंदीकरण केल्यानंतर बाधितांनी पुनर्वसन व दुरुस्तीच्या नावाखाली वाढीव बेकायदा बांधकामे केली.

प्रभाग अधिकाऱ्याचे निलंबन?
कल्याण : शिवाजी चौक ते महात्मा फुले चौकादरम्यान केडीएमसीने रस्ता रुंदीकरण केल्यानंतर बाधितांनी पुनर्वसन व दुरुस्तीच्या नावाखाली वाढीव बेकायदा बांधकामे केली. मात्र, ही बांधकामे केडीएमसीचे ‘क’ प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांच्या आशीर्वादाने झाली. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, असा प्रस्ताव शिवसेनेचे स्थायी समितीचे सदस्य मोहन उगले यांनी शुक्रवारच्या स्थायीच्या सभेत दाखल केला आहे. सभापती संदीप गायकर यांनीही वानखेडे यांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे निलंबनाचा प्रस्ताव मंजूर होण्याची दाट शक्यता आहे.
जानेवारीत शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण झाले. या कारवाईत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या दुकानांच्या वाढीव बांधकामांवर हातोडा घालण्यात आला. यात काही इमारतीही होत्या. या कारवाईत ३१२ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. दरम्यान, या रस्ता रु ंदीकरणात बांधकामे बाधित झालेल्या काही व्यापाऱ्यांनी सर्रास दुरुस्तीच्या नावाखाली वाढीव बांधकामे केली आहेत. काही बांधकामांचे इमले दोन ते तीन मजल्यांपर्यंत उभारले आहेत. ज्यांच्या बांधकामांना स्थगिती आदेश आहेत, त्यांचेही या रस्ता रुंदीकरणात चांगलेच फावले आहे.