रस्तारुंदीकरण मोहिमेच्या कारवाईला स्थगिती
By Admin | Updated: November 10, 2016 02:58 IST2016-11-10T02:58:49+5:302016-11-10T02:58:49+5:30
एकीकडे पूर्वेतील केळकर मार्गावरील रहिवासी आणि व्यापाऱ्यांची रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईबाबत विरोधाची भूमिका असताना दुसरीकडे पश्चिमेकडील

रस्तारुंदीकरण मोहिमेच्या कारवाईला स्थगिती
डोंबिवली : एकीकडे पूर्वेतील केळकर मार्गावरील रहिवासी आणि व्यापाऱ्यांची रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईबाबत विरोधाची भूमिका असताना दुसरीकडे पश्चिमेकडील पं. दिनदयाळ मार्गाच्या रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्यांनी कारवाईला विरोध केला आहे. नुकत्याच राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेंतर्गत त्यांनी रस्ता-रुंदीकरणाला तीव्र विरोध दर्शवला असताना यात बाधित होणाऱ्या बंगलेधारकांनी कारवाईविरोधात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने केडीएमसीच्या कारवाईला २३ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे.
शहरविकासाच्या नावाखाली रहिवाशांना रस्त्यावर आणण्याचा केडीएमसी प्रशासनाचा पवित्रा निषेधार्थ आहे. विश्वासात न घेता राबविली जाणारी मोहीम चुकीची आहे, असे मत कारवाई विरोधात लढणाऱ्या पं. दिनदयाळ मार्ग रहिवासी संघर्ष समितीने मांडले आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील द्वारका हॉटेल ते रेतीबंदर रोड हा पंडित दिनदयाळ मार्ग म्हणून ओळखला जातो. कल्याण-डोंबिवली महापालिकेने हाती घेतलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेत शहरातील प्रमुख रस्त्यांमध्ये पं. दिनदयाळ मार्गाचाही समावेश आहे. या मोहिमेंतर्गत महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयाने या मार्गावरील अनेक निवासी बांधकामांना नोटिसा बजावल्या आहेत. १८ इमारती व १४ बंगले आहेत. त्यात ४८८ कुटुंबे राहतात. याचबरोबर या कारवाईत ८५ दुकानेही बाधित होणार आहेत. या एकंदरीतच कारवाईत अंदाजे ३ हजार नागरिक विस्थापित होतील, असा दावा रहिवासी संघर्ष समितीचा आहे. १९९५-९६ मध्ये याच रस्त्याचे रुंदीकरण एकदा करण्यात आले आहे. त्यावेळी बाधित झालेले रहिवासी आणि व्यापारी यांना अद्यापपर्यंत याचा कोणताही मोबदला मिळालेला नाही, याकडे रहिवाशी संघाने लक्ष वेधले आहे. या कारवाईला काँग्रेसनेही विरोध दर्शवला आहे. या मार्गावर केल्या जाणाऱ्या रस्ता रुंदीकरणाचा जो विकास आराखडा सादर केला आहे, तो तीनवेळा वेगवेगळ्या प्रकारे सादर केल्याने महापालिका एकप्रकारे बाधितांची दिशाभूल करीत आहे, असा काँगे्रसचा आरोप आहे. (प्रतिनिधी)