लाचखोर प्राध्यापकाचे निलंबन
By Admin | Updated: May 23, 2016 04:41 IST2016-05-23T04:41:04+5:302016-05-23T04:41:04+5:30
नापास झालेल्या विषयांमध्ये पास करण्यासाठी विद्यार्थ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेला सहायक प्राध्यापक भीमराव खरात याला शनिवारी बिर्ला महाविद्यालयाने निलंबित केले

लाचखोर प्राध्यापकाचे निलंबन
कल्याण : नापास झालेल्या विषयांमध्ये पास करण्यासाठी विद्यार्थ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेला सहायक प्राध्यापक भीमराव खरात याला शनिवारी बिर्ला महाविद्यालयाने निलंबित केले. यासंदर्भात चौकशीसाठी विशेष समितीही नेमल्याचे महाविद्यालयाने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
बिर्ला महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक असलेल्या खरातने कला शाखेतील तृतीय वर्षाची परीक्षा दिलेल्या आणि दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्याकडे पास करण्यासाठी प्रत्येक विषयासाठी दोन हजारांप्रमाणे चार हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती साडेतीन हजार रुपये देण्याचे ठरले. परंतु, याबाबत संबंधित विद्यार्थ्याने ठाणे लाचलुचपतविरोधी विभागाकडे तक्रार केली होती. त्याआधारे १७ मे रोजी विद्यार्थ्याकडून लाच स्वीकरताना खरात याला रंगेहाथ अटक करण्यात आली. या गैरवर्तनप्रकरणी बिर्ला महाविद्यालयानेही त्याला निलंबित केले आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी १८ मे रोजी महाविद्यालय प्रशासनाने तातडीने बोलवलेल्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. विशेष बाब म्हणजे या प्रकरणाच्या चौकशीसाठी व्यवस्थापन समितीचे सदस्य सुबोध दवे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. यात वरिष्ठ उपप्राचार्य स्वप्ना समेळ, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. गोरखनाथ शिखरे यांचा समावेश आहे.