रिक्षा परवान्यांना स्थगिती द्या

By Admin | Updated: May 5, 2017 05:56 IST2017-05-05T05:56:05+5:302017-05-05T05:56:05+5:30

वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता वाहतुकीचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनत चालला आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील रिक्षांची

Suspend rickshaw license | रिक्षा परवान्यांना स्थगिती द्या

रिक्षा परवान्यांना स्थगिती द्या

कल्याण : वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता वाहतुकीचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनत चालला आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील रिक्षांची संख्या पुरेशी असल्याने नवीन रिक्षा परवान्यांना तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी मागणी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनाही निवेदन दिले आहे.
रिक्षांची वाढलेली संख्या पाहता उपनगरांतील रेल्वे स्थानक परिसरात पार्किंग व रिक्षा स्टॅण्डसाठी जागा अपुरी पडत आहे. २०१४-१६ यामध्ये आॅनलाइनद्वारे नवीन परवान्यांचे वाटप करण्यात आले. तसेच नूतनीकरणास विलंब झाल्यामुळे रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे अभय योजनेद्वारे शुल्क आकारून नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे रिक्षांच्या संख्येत भर पडली आहे. अन्य दुचाकी आणि चारचाकी वाहनांचीही वाढलेली संख्या पाहता याचा फटका रिक्षा व्यवसायालाही बसत असल्याने शहरे व उपनगरे परिसरांत भविष्यात होणाऱ्या स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर लोकसंख्येचे प्रमाण पाहून त्या प्रमाणात नवीन रिक्षा परवानावाटप करण्याचा निर्णय घ्यावा, याकडे महासंघाचे अध्यक्ष व नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी लक्ष वेधले आहे.
भविष्यात त्यात्या शहरात रिक्षा परवाने देण्याची आवश्यकता भासल्यास शहरातील रस्त्यांची परिस्थिती, लोकसंख्या, वाहतुकीची समस्या व इतर बाबींचा विचार करावा तसेच प्रत्येक शहरात किमान किती रिक्षांची गरज आहे, त्यानुसारच तिथल्या स्थानिक वाहतूक पोलीस, पोलीस ठाण्याचे अधिकारी, रिक्षा संघटना आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची मते जाणून घ्यावीत, असेही महासंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

वारसदारांची नोंद करा

रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्यास त्याचा परवाना वारसदार म्हणून आई, पत्नी व मुलगा यांच्या नावे करताना (वारसाहक्कपत्र) बऱ्याच प्रक्रियेला सामोरे जावे लागते.
या प्रक्रियेत आर्थिक तसेच वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे परवाना नूतनीकरणावेळी रजिस्टरमध्ये परवानाधारकांच्या वारसदारांची नोंद व्हावी, जेणेकरून परवानाधारकाची वारसदार परवाना हस्तांतर प्रक्रिया सोयीची व पारदर्शक होईल, याकडेही महासंघाने लक्ष वेधले आहे.

Web Title: Suspend rickshaw license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.