येत्या बुधवारी सुपरमून दर्शन, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिली माहिती
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 29, 2025 14:50 IST2025-10-29T14:47:57+5:302025-10-29T14:50:39+5:30
Supermoon News: येत्या बुधवारी ५ नोव्हेंबर रोजी, त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री आकाशात आपणा सर्वांना सुपर मून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले.

येत्या बुधवारी सुपरमून दर्शन, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिली माहिती
ठाणे - येत्या बुधवारी ५ नोव्हेंबर रोजी, त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री आकाशात आपणा सर्वांना सुपर मून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की , पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ असेल तर चंद्रबिंब जास्त मोठे आणि जास्त तेजस्वी मनोहारी दिसते. तसे ते बुधवारी ५ नोव्हेंबर रोजी रात्री दिसणार आहे.
चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किमी. अंतरावर असतो. या दिवशी तो पृथ्वीपासून ३लक्ष ५६ हजार ८३४ किमी. अंतरावर येणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान आणि कमी तेजस्वी दिसते.याला मायक्रो मून म्हणतात .सुपर मून हा मायक्रो मूनपेक्षा १३ टक्के मोठा आणि ३० टक्के जास्त तेजस्वी दिसतो. तसा तो बुधवारी ५ नोव्हेंबर रोजी रात्री दिसणार आहे.
बुधवारी ५ नोव्हेंबर रोजी सुपर मून सायं. ५-४४ वाजता पूर्वेला उगवेल आणि रात्रभर आपणास सुंदर दर्शन देईल. या पुढील सुपर मून पुढच्याच महिन्यात गुरूवार ४ डिसेंबर रोजी दत्तजयंतीच्या रात्री आपणास दिसणार असल्याचे दा.कृ.सोमण यांनी सांगितले.