वर्चस्व रोखण्यासाठीच ‘सुपारी’चा घाट? आमदारकीचे स्वप्न धूसर झाल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 06:40 AM2018-01-02T06:40:12+5:302018-01-02T06:40:15+5:30

ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क असलेले आणि आगामी २०१९ च्या आमदारकीच्या स्पर्धेत असलेले भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांचे आमदारकीचे स्वप्न हत्येच्या सुपारी प्रकरणामुळे धूसर झाल्याची चर्चा आहे.

 'Supari' valley to prevent domination? Discussion about the dream of MLAs was shriveled | वर्चस्व रोखण्यासाठीच ‘सुपारी’चा घाट? आमदारकीचे स्वप्न धूसर झाल्याची चर्चा

वर्चस्व रोखण्यासाठीच ‘सुपारी’चा घाट? आमदारकीचे स्वप्न धूसर झाल्याची चर्चा

Next

कल्याण : ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क असलेले आणि आगामी २०१९ च्या आमदारकीच्या स्पर्धेत असलेले भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांचे आमदारकीचे स्वप्न हत्येच्या सुपारी प्रकरणामुळे धूसर झाल्याची चर्चा आहे. पाटील यांच्याशिवाय कल्याण ग्रामीणमध्ये पर्याय नाही, असे जरी पक्षातील स्थानिक नेत्यांकडून म्हटले जात असले, तरी त्यांचे वर्चस्व कमी करण्यासाठीच काहींनी हे सुपारी प्रकरण घडवले गेल्याचेही दबक्या आवाजात चर्चा आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे भाजपाचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची ५० लाखांची सुपारी दिल्याप्रकरणी महेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रारंभी ग्रामीण पोलीसअंतर्गत गणेशपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेला हा गुन्हा आता ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. डोंबिवलीच्या स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्यातही हा गुन्हा दाखल असून सध्या ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे तपास आहे. यातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाईची शक्यता पोलिसांनी वर्तवल्याने एकंदरीतच हे प्रकरण महेश पाटील यांना चांगलेच भोवण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणात भाजपाचा एक मंत्री दबावतंत्राचा अवलंब करत असल्याची वरिष्ठ अधिकाºयांचीच माहिती असल्याने तपास भरकटण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
या प्रकरणात पाटील यांचे आलेले नाव चर्चेचा विषय ठरला असताना त्यांच्या ग्रामीण भागातील वर्चस्वालाही एक प्रकारे धक्का बसला आहे. मात्र, पाटील यांचा दांडगा जनसंपर्क पाहता त्यातच पक्षासाठी वाटेल ते करण्याची त्यांच्यात धमक असल्याने आगामी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी कल्याण ग्रामीणचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जाते.
मागील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ग्रामीणचे उमेदवार म्हणून नंदू परब हे प्रमुख दावेदार मानले जात होते. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्ती म्हणून ओळख असलेल्या परब यांनाच उमेदवारी मिळेल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, चढाओढीत शिवसेनेतील नाराजीचा फायदा उठवणे पक्षातील स्थानिक नेत्यांना भारी पडले आणि यामध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींत भाजपाला आपला उमेदवारही ग्रामीण मतदारसंघात देता आला नाही.
कल्याण परिक्षेत्रातील अन्य तीन मतदारसंघांत भाजपाचे उमेदवार निवडून आले असताना कल्याण ग्रामीणमध्ये मात्र शिवसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली. त्या वेळी दावेदार असलेल्या परब यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी पक्षातील काहींनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात होते. आता तीच खेळी पाटील यांच्याबाबतीत खेळली जात असल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभेची निवडणूक आॅक्टोबर २०१९ मध्ये आहे. मात्र, ही निवडणूक मे २०१९ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकांबरोबर होण्याचीही दाट शक्यता आहे. निवडणुकीला
दोन वर्षांचा कालावधी अद्याप बाकी आहे.
दरम्यान, पाटील हे सुपारी प्रकरणात अडकल्याने त्यांना ग्रामीणची उमेदवारी मिळणार नाही, असे तर्क सध्या लावले जात असले, तरी त्यांनाच ग्रामीणची उमेदवारी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. दुधाने तोंड पोळले की, ताकही फुंकून प्यायले जाते, या उक्तीनुसार मागील विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागात घडलेले नाट्य पाहता अन्य पक्षांतील एखाद्या नाराजाला आयात करून त्याला ग्रामीणची उमेदवारी देणे परवडणारे नाही आणि असे धाडस ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा होणार नाही, असाही सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे.

मोरेश्वर भोईर,
नंदू परबही तुल्यबळ

कल्याण ग्रामीण मतदारसंघात भाजपाचे उमेदवार म्हणून नगरसेवक महेश पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे.
असे असले तरी उपमहापौरपद भूषवणारे मोरेश्वर भोईर, माजी आमदार रमेश पाटील, पक्षाचे पदाधिकारी असलेले शिवाजी आव्हाड, नंदू परब आणि भाजपाचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांचाही ग्रामीण भागात पगडा आहे.
ते देखील आमदारकीच्या स्पर्धेत असल्याचे बोलले जात आहे. महेश पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना त्यांच्याच पक्षातील या विरोधकांचा सामाना करावा लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही निवडणूक पाटील यांच्यासाठी निश्चित सोपी नाही.

कल्याण ग्रामीण या मतदारसंघात भाजपाला जम बसवायचा आहे. तेथील राजकारणात आक्रमक चेहरा दिला तरच पक्षाचा निभाव लागेल, असे नेत्यांचे मत आहे. त्यासाठीच महेश पाटील यांना उतरवण्यात आले. मात्र वेगवेगळे घटक अचानक सक्रिय झाल्याचा फटका त्यांना बसला.

Web Title:  'Supari' valley to prevent domination? Discussion about the dream of MLAs was shriveled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा