अंधांना दूरदृष्टी देणाऱ्या बदलापूरच्या सुहासिनीताई
By Admin | Updated: March 28, 2017 05:58 IST2017-03-28T05:58:05+5:302017-03-28T05:58:05+5:30
ज्या काळात महिला शिक्षणापासून दूर होत्या, अशा काळात त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले... ज्या काळात महिलांनी नोकरी

अंधांना दूरदृष्टी देणाऱ्या बदलापूरच्या सुहासिनीताई
पंकज पाटील / बदलापूर
ज्या काळात महिला शिक्षणापासून दूर होत्या, अशा काळात त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले... ज्या काळात महिलांनी नोकरी करू नये, हा समज समाजात दृढ होता, त्या काळात नोकरी केली... ज्या काळात सासू आणि सुनेचे हाडवैर गृहीत धरले जात होते, त्या काळात सुनेसाठी सासूच प्रेरणादायी ठरली... आणि स्वत:मधील आत्मविश्वास आणि कुटुंबातील प्रत्येकाने दिलेला आधार यामुळेच सुहासिनी मांजरेकर यांनी सामाजिक कार्यात उत्तुंगभरारी घेतली. ज्या मुलांना कायमचे अंधत्व आले आहे, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून दूरदृष्टी देण्याचे अनमोल कार्य मांजरेकर यांनी करून त्या सर्वांची ‘ताई’ झाल्या. यशस्वी अंध विद्यार्थी हीच काय ती आपली पुंजी समजून उतारवयातदेखील त्या प्रगती विद्यालयाच्या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांसाठी अविरत झटत आहेत.
लग्नापूर्वीच्या वत्सला सीताराम तारकर आणि लग्नानंतरच्या सुहासिनी मांजरेकर यांचा जन्म मुंबईतल्या गिरगावातला. मूळच्या कोकणातील असल्या तरी त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईतच झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी.मधून त्यांनी पदवी संपादन केली. हिंदी आणि विणकामात विशेष प्रावीण्य प्राप्त केले. मुलींच्या शिक्षणाला विरोध केला जात असताना सुहासिनी यांचे वडील त्यांच्यामागे ठामपणे उभे राहिले. जेवढे शिक्षण घेता येईल तेवढे घे, असा सल्ला त्यांनी दिला.
वडिलांच्या या भूमिकेमुळे त्यांना शिक्षण घेता आले. शिक्षण झाल्यावर त्यांचा विवाह सत्यवान मांजरेकर यांच्यासोबत झाला. पती चर्नीरोडच्या शासकीय प्रेसमध्ये अधिकारीपदावर होते, तर सासू लक्ष्मीबाई मांजरेकर शिक्षिका होत्या. सासूबार्इंची इच्छा होती की, एवढे शिक्षण घेतले आहे, तर मग नोकरी करण्यास काही हरकत नाही. सुरुवातीला पतीने नोकरी करण्याची गरज नाही, असाच सल्ला दिला. मात्र, सासूबाई त्यांच्यासोबत असल्याने त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. ताडदेवच्या व्हिक्टोरिया मेमोरेबल ब्लाइंड स्कूलमध्ये त्यांनी १५ वर्षे नोकरी केली. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्व खर्च त्यांच्या पालकांना करावा लागत होता. मात्र, ज्या अंध विद्यार्थ्यांच्या पालकांना पैसे भरणे शक्य नव्हते, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात होता. ही बाब तार्इंच्या लक्षात आल्यावर त्यांनी गरीब अंध विद्यार्थ्यांसाठी अंध विद्यालय सुरू करण्याचा निश्चय केला. पतीचे अकाली निधन झाल्याने त्या धक्कयातून सावरत त्यांनी नोकरी कायम ठेवली. शाळा सुरू करण्याची त्यांची इच्छा त्यांनी वडिलांकडे व्यक्त केली. वडिलांनीदेखील त्यास
अनुमती दिली. मग, सुरू झाला शाळेच्या जागेचा शोध. ओळखीतल्या एका व्यक्तीने बदलापूर गावातील
एक घर विकायचे असून त्या घरात शाळा सुरू करू शकता, असा प्रस्ताव ठेवला. ते घर विकत घेऊन अंध विद्यार्थ्यांची शाळा सुरू केली. एका विद्यार्थ्याच्या प्रवेशापासून ही शाळा सुरू झाली. सलग ७ वर्षे कोणतेही अनुदान न घेता त्यांनी स्वखर्चाने शाळा सुरू ठेवली.
विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर कोणताही आर्थिक भार न टाकता त्यांनी शाळा चालवली. हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. संस्थेचे कार्य पाहून शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांमागे मासिक २२५ रुपये अनुदान सुरू केले. आजघडीला हे अनुदान प्रत्येक विद्यार्थ्यामागे ५०० रुपये झाले आहे. शाळेत दाखल अंध विद्यार्थी एका गावातील नसून अनेक जिल्ह्यातून येत असल्याने त्यांच्या निवासाची सोय शाळेतच करावी लागते. त्यामुळे शासनाचे अनुदान कमी पडत असले तरी तार्इंनी आपली शाळा दानशूर व्यक्तींच्या मदतीवर सुरूच ठेवली आहे. त्यातही आर्थिक अडचण निर्माण झालीच, तर स्वत: आर्थिक हातभार देत आहेत. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांना काही कमी पडणार नाही, याची काळजी त्या स्वत: घेत आहेत.
‘प्रगती अंध विद्यालयात’ केवळ शैक्षणिक उपक्रम न राबवता विद्यार्थ्यांमध्ये इतर गुण निर्माण व्हावे, यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. संगीत क्षेत्रातील प्रगती अंध विद्यालयाचे विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने नावारूपाला आले आहेत. उत्कृष्ट गायक, तबलावादक, ढोलकीवादक आणि नृत्याविष्कार सादर करणारे विद्यार्थी तयार झाले आहेत. संगीतात या शाळेने एवढी प्रगती केली आहे की, या शाळेच्या विद्यार्थ्यांचा स्वत:चा आॅर्केस्ट्रा ग्रुप तयार झाला आहे. अनेक ठिकाणी येथील विद्यार्थी संगीताचे कार्यक्रम घेत आहेत.
ताल सुरांचा अनोखा मिलाप
ताल आणि सुरांचा अनोखा मिलाप या शाळेत अनुभवास येतो. नृत्याविष्काराचे दोन अनोखे प्रयोग शाळेने केले आहेत. ‘स्टेटिंग नृत्य’ आणि ‘परातीवरील दांडिया’ ही येथील विद्यार्थ्यांची खासियत आहे. या नृत्याविष्कारांना भरभरून दाद मिळते. शाळेच्या या गौरवशाली परंपरेमुळे तार्इंना केंद्र, राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर एक नव्हे, तर तब्बल १ हजार ९५० पुरस्कार देऊन गौरविले आहे. ज्या व्यक्तींनी या शाळेला भेट दिली आहे ती प्रत्येक व्यक्ती या शाळेच्या प्रेमात पडली आहे.