उष्णतेमुळे कलिंगडाला सुगीचे दिवस
By Admin | Updated: March 31, 2017 06:11 IST2017-03-31T06:11:06+5:302017-03-31T06:11:06+5:30
गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील तापमानात वाढ झाली असून या वाढत्या उष्णतेमुळे थंडगार कलिंगड खरेदीला मात्र

उष्णतेमुळे कलिंगडाला सुगीचे दिवस
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील तापमानात वाढ झाली असून या वाढत्या उष्णतेमुळे थंडगार कलिंगडखरेदीला मात्र सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या चार दिवसांत खरेदीत चांगली वाढ झाली असून शेदोनशे नव्हे, तर एका विक्रेत्याकडून दिवसाला तब्बल ५०० कलिंगडांची विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले.
नको तो उन्हाळा, असे म्हणणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सध्या त्रस्त भाव दिसून येत आहेत. रणरणत्या मार्च महिन्यात उकाड्याने समस्त ठाणेकर हैराण झाले आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पारा ४० अंशांच्या पलीकडे गेला आहे. या उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल, छत्री, स्कार्फ, सनकोटचा आधार घेतला जात आहे. अंगाची लाहीलाही झाली असताना ठाणेकर थंड पेय, थंड फळांकडे वळत आहे. पन्हं, शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, सरबत याचबरोबर कलिंगडांच्या खरेदीकडे ठाणेकरांनी मोर्चा वळवला आहे. कलिंगड हे पोटाला थंडावा देणारे फळ असल्याने उन्हाळ्यात त्याची हमखास खरेदी केली जाते. गतवर्षी कलिंगडखरेदीला उतरती कळा होती. परंतु, यंदा त्यात दुपटीने वाढ झाली असल्याचे फुरखान या विक्रेत्याने सांगितले. एक महिन्यापासून कलिंगड बाजारात आले असले, तरी चार दिवसांपासून कलिंगडखरेदीत तुफान वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात दिवसाला ४०० कलिंगड आम्ही विकले. या आठवड्यात हा आकडा ५०० वर गेल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. आकाराप्रमाणे कलिंगडाचे दर असून ३० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत प्रतिनग विक्री सुरू आहे. यात ५०, ६० आणि ७० रुपयांच्या कलिंगडाची खरेदी अधिक प्रमाणात करीत असल्याचे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले. सकाळी कलिंगडाच्या खरेदीसाठी झुंबड असते. बाजारपेठांपेक्षा रस्त्याच्या कडेला कलिंगडांचे डोंगर रचलेले दिसून येतात. सध्या आम्ही ८० टन कलिंगडं विक्रीसाठी असून, यापैकी ६० टन कलिंगडं विकली. गतवर्षी हा आकडा ३० ते ३५ टन इतका होता, असे फुरखान याने सांगितले. (प्रतिनिधी)
माणगाव, खेडवरून आवक
माणगाव आणि आता खेडवरून कलिंगडांची आवक होत आहे. २० मे पर्यंत कलिंगडखरेदी सुरू राहील, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. कलिंगडांबरोबर कलिंगडांच्या खापा करून त्याची एक प्लेट १५ रुपये दराने विकली जात आहे.