गळ्यात नऊ सेंमीची घुसलेली काडी काढण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 02:08 AM2020-01-19T02:08:54+5:302020-01-19T02:10:01+5:30

श्वासनलिकेच्या अर्ध्याअधिक भागात तब्बल नऊ सेंटीमीटरपर्यंत घुसलेली ही काडी अत्यंत जिकिरीची शस्त्रक्रिया यशस्वी करून काढण्यात आल्याने ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या शिरपेचात नवा तुरा खोवला आहे.

Success in removing a nine cm intravenous rod in the throat | गळ्यात नऊ सेंमीची घुसलेली काडी काढण्यात यश

गळ्यात नऊ सेंमीची घुसलेली काडी काढण्यात यश

Next

- पंकज रोडेकर
ठाणे : गाडीवरून पडल्याने भिवंडीच्या रमेश गजरे (३५) यांच्या गळ्यात १२ सेंटीमीटर लांबीची लाकडी काडी घुसली. त्यांच्या श्वासनलिकेच्या अर्ध्याअधिक भागात तब्बल नऊ सेंटीमीटरपर्यंत घुसलेली ही काडी अत्यंत जिकिरीची शस्त्रक्रिया यशस्वी करून काढण्यात आल्याने ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या शिरपेचात नवा तुरा खोवला आहे. गजरे यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा सामान्य (सिव्हील) रुग्णालय प्रशासनाने दिली.

भिवंडीच्या अंबाडी परिसरात राहणारे गजरे यांना शुक्रवारी सकाळी अपघात झाला. गाडीवरून पडल्यानंतर रस्त्यावर पडलेली लाकडी काडी त्यांच्या गळ्यात घुसली. गळ्यात नऊ सेंटीमीटरपर्यंत आत काठी घुसल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना त्यांच्या मित्र मंडळींनी भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, गजरे यांना घेऊन त्यांचे नातलग ठाण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. घुसलेली काडी काढण्यापूर्वी त्यांचा सिटी स्कॅन करण्याचा निर्णय घेतला. काठी आत खोलवर घुसलेली असल्याने व जखम गंभीर असल्याने त्यांना तातडीने मुंबईला उपचाराकरिता पाठवण्यात यावे, असे काहींचे मत होते.  मात्र, डॉ. माधवी पंदारे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत व गजरे यांच्या जखमेतून अगोदरच झालेला रक्तस्राव पाहून त्यांच्यावर ठाण्यातच जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतला. गजरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. ही शस्त्रक्रिया डॉ. माधवी पंदारे, डॉ. विलास साळवे, भूलतज्ज्ञ डॉ. रेश्मा, डॉ. उज्ज्वला केंद्रे, परिचारिका वैशंपायन आदी टीमने यशस्वी केली.

शस्त्रक्रियेला लागले दोन तास
नऊ सेंटीमीटर लांबीची लाकडी काडी गळ्यात घुसल्याने ती खेचून काढता येणे शक्य नव्हते. घुसलेल्या काडीमुळे गळ्याजवळील महत्त्वाच्या भागांना किती दुखापत झाली, याचा अंदाज येत नव्हता. ती काडी शस्त्रक्रिया करून काढण्याचा निर्णय झाल्यावर त्या शस्त्रक्रियेला साधारणत: दोन तासांचा कालावधी लागल्याचे सूत्रांनी सांगितले. गजरे यांना झालेली जखम बरी होण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले.

गजरे यांच्यावरील शस्त्रक्रिया नक्की गंभीर होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शस्त्रक्रिया यशस्वी केली. अशा प्रकारची अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया करण्याची ही बहुधा रुग्णालयातील पहिलीच वेळ असावी. - डॉ. कैलास पवार,
शल्यचिकित्सक, ठाणे

Web Title: Success in removing a nine cm intravenous rod in the throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.