ठाणे: कारमधून फिरायला कोलशेत खाडी रोड परिसरात गेले असताना, ती रस्ता सोडून खाडी किनारच्या चिखलात गेली आणि त्यामध्ये अडकली. ही घटना मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास समोर आली. त्या कारमध्ये सहा जण अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांना यश आले आहे. सुदैवाने यामध्ये कारमधील कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.
अपघातग्रस्त टोयोटा फॉर्च्युनर कार ही हरेंद्र सिंग यांच्या मालकीची असून त्या कारवर चालक संकेत सिंग (२८) हा आहे. त्याच्यासह कारमध्ये रोहित नायर, हेनेरी जोन,ईश्वरी खैरे,पूजा रतुरी आणि अश्विनी कुमार हे सहा चेंबूर वरून ठाण्यातील वागळे इस्टेट मधील एका हॉटेलमध्ये आले होते, त्यानंतर ते श जण तेथून फिरायला कोलशेत खाडीरोड परिसरात मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास गेले होते.
याचवेळी ती कार रस्ता सोडून खाडी किनारच्या चिखलात जाऊन अडकली. या घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलीस,ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेत, बचाव कार्य सुरू केले. कार मध्ये अडकलेल्या त्या सहा जणांना बाहेर काढण्यात यश आले. तसेच या वेळी १ आपत्कालीन निविदा आणि १ -रेस्क्यू वाहन आणि १ हायड्रा क्रेनला पाचारण केले होते. तसेकंग ती कारही बाहेर काढण्यात आल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.