विद्यार्थी तणावात, पालक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST2021-02-24T04:41:21+5:302021-02-24T04:41:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा काही शहरे लाॅकडाऊनच्या तयारीत आहेत. मात्र, अशातच दहावी-बारावीच्या ...

Students in stress, parents in anxiety | विद्यार्थी तणावात, पालक चिंतेत

विद्यार्थी तणावात, पालक चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा काही शहरे लाॅकडाऊनच्या तयारीत आहेत. मात्र, अशातच दहावी-बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केल्याने बहुतांश परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच वर्षभर प्रत्यक्ष शाळा नसल्याने अभ्यासाची नसलेली लिंक, परीक्षेबाबतचा गोंधळ आणि आता परीक्षेसाठी बाहेर पडताना कोरोनाची धास्ती या सगळ्यांमुळे विद्यार्थी तणावात आहेत.

कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाला म्हणून मागील महिन्यापासून शासनाने ९ वी ते १२ वीच्या प्रत्यक्ष शाळा सुरू केल्या. त्यानंतर ५ वी ते ८ वीच्या शाळाही काही जिल्ह्यांत सुरू करण्यात आल्या. मात्र, गेल्या आठवडाभरापासून राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुन्हा काही जिल्ह्यांत शाळा ६ मार्चपर्यंत बंद केल्या आहेत. ग्रामीण ठाणे जिल्ह्यात सुरू झालेल्या शाळा पुन्हा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिले. मात्र आता त्यातच दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या शासनाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांसह पालक संभ्रमित झाले आहेत.

--------

एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सर्वांनाच घरात थांबायचे आवाहन केले जात आहे. मग दहावीच्या परीक्षा ऑफलाइन घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी का खेळत आहेत?

- दिनकर पेडणे, पालक

---------

दहावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय हा सरकारच्या दृष्टीने योग्य असेल, पण मग विद्यार्थ्यांना संपर्कातून काही त्रास झाला तर ते फारच धोकादायक ठरेल.

- मनोहर राजुर, पालक

-------

आतापर्यंत वर्षभरात अभ्यास जसा ऑनलाइन झाला किंवा इतर काही इयत्तांच्या, शाखांच्या परीक्षा ऑनलाइन झाल्या तसेच दहावीच्या परीक्षाही ऑनलाइन घेणे शक्य आहे का, हे शासनाने आधी एकदा पडताळून पाहून नंतरच निर्णय घेतला असता तर बरे झाले असते.

- हिमानी सवाखंडे, पालक

------

बारावीच्या ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय तसा चुकीचा नाही. मात्र, कोरोनाचे वाढते संकट पाहता त्याला पर्याय काही असेल का, हे पाहायला हवे.

- माधव जिनकर, पालक

------

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेऊन विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना शासनाने परीक्षेबाबत काही अंशी सवलत द्यायला हवी होती.

- विद्या रहाटे, पालक

---------

कोरोनाची रुग्णसंख्या परत वाढते आहे. परीक्षा एप्रिल मे महिन्यात आहे. तोपर्यंत काय स्थिती असेल माहीत नाही. मात्र, अशा धोकादायक स्थितीत मुलांना परीक्षेसाठी घराबाहेर पाठवणे तरी धोक्याचे वाटते. येत्या महिनाभरात कोरोना रुग्णसंख्या कमी होईल अशी अपेक्षा आहे.

- मंजुळा रेळे, पालक

Web Title: Students in stress, parents in anxiety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.