विद्यार्थ्यांनी उद्याचं राजकारण ताब्यात घ्यावं !
By Admin | Updated: September 15, 2015 23:12 IST2015-09-15T23:12:40+5:302015-09-15T23:12:40+5:30
समोर विद्यार्थी बसलेले असल्यामुळे मी राजकारणावर काही बोलणार नाही, पण तुम्ही खूप मोठे व्हा आणि राजकारण ताब्यात घ्या, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

विद्यार्थ्यांनी उद्याचं राजकारण ताब्यात घ्यावं !
डोंबिवली : समोर विद्यार्थी बसलेले असल्यामुळे मी राजकारणावर काही बोलणार नाही, पण तुम्ही खूप मोठे व्हा आणि राजकारण ताब्यात घ्या, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी येथे केले. कल्याण-डोंबिवलीतील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याअंतर्गत सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झालेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी डोंबिवलीतील शाळांमधील आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटपाचा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत मंगळवारी हे वाटप करण्यात आले. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पणही याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला मंत्र शिवसैनिकांनी आजही प्राणपणाने जपला आहे, असे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले. शिवसेनेचे समाजकार्य शाखांच्या माध्यमातून २४ तास सुरू असते, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या भावी विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून ओळखल्या जाणा-या कल्याण आणि डोंबिवली या शहरांमध्ये मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रमुख प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. त्यात अग्निशमन दलात नव्याने दाखल झालेल्या जपानी बनावटीच्या अत्याधुनिक ५५ मीटर उंच शिडी असलेले अग्निशमन वाहन, आधारवाडी येथील सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी), कल्याण स्पोर्ट्स क्लब येथील जलतरण तलाव, बैलबाजार येथे माजी कामगार मंत्री साबिरभाई शेख उद्यान, चिकणघर येथील उद्यान, डोंबिवली पूर्व येथील सार्वजनिक ग्रंथालयाची नवीन इमारत आदींचे लोकार्पण करण्यात आले. भाजपासह आयुक्तांनी फिरवली पाठ : या सर्व उपक्रमांना भाजपासह केडीएमसीच्या आयुक्तांनी अनुपस्थित होते. कल्याणच्या जलतरण तलावात पाणी कुठुन आले, महाराष्ट्रात दुष्काळ असतांना शिवसेना हे काय करत आहे. आगामी काळातील निवडणुकांमध्ये मतदार हे सर्व लक्षात ठेवतील असे, आमदार नरेंद्र पवार म्हणाले.