वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अखेर मिळाले धान्य
By Admin | Updated: March 21, 2017 01:45 IST2017-03-21T01:45:54+5:302017-03-21T01:45:54+5:30
तालुक्यातील सुमारे आठ वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची उपासमार ‘लोकमत’ने ‘शिक्षक आणतात उसनवारीवर धान्य’ या मथळ्याखाली

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अखेर मिळाले धान्य
मुरबाड : तालुक्यातील सुमारे आठ वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची उपासमार ‘लोकमत’ने ‘शिक्षक आणतात उसनवारीवर धान्य’ या मथळ्याखाली ८ मार्च रोजी उघड केली. या वृत्ताने जिल्हा पुरवठा विभाग खडबडून जागा झाला असून त्यांनी सोमवारी मुरबाडमधील वसतिगृहातील अर्धपोटी राहणाऱ्या विद्यार्थ्यांची भूक भागवण्यासाठी मुरबाडचे तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी शहापूर तहसीलदार कार्यालयाकडून सुमारे ८०० क्विंटल धान्य उपलब्ध केले आहे. तालुक्यातील आठ वसतिगृहांना हे धान्य पुरवले जाणार आहे.
मुरबाड तालुक्यातील शिरोशी, न्याहाडी, सरळगाव, तळेगाव, न्हावे सासणे, वाल्हिवरे, तळवली, झापवाडी, येथे शिक्षणाची तसेच राहण्याची सोय असल्याने आदिवासींनी आपल्या मुलांसाठी येथे प्रवेश घेतला. परंतु, त्या वसतिगृहांना आठ महिन्यांपासून शासनाकडून धान्यपुरवठाच झाला नाही.
या मुलांची भूक भागवण्यासाठी शिक्षकवर्ग धान्य उसनवारीवर आणत. त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांना अर्धपोटी राहावे लागत असे. अर्धपोटी राहून अभ्यास करावा लागत असल्याने हे विद्यार्थी येथून कंटाळून घरी पळ काढत.
लोकमतने ही विदारक परिस्थिती उघड करून प्रशासनाला जाग आणत पुरवठा विभागाने किमान तात्पुरती व्यवस्था करून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दिलासा दिल्याने पालकांनी लोकमतचे आभार मानले आहेत. (वार्ताहर)