बँक खाती उघडल्याने विद्यार्थी अचंबित

By Admin | Updated: December 22, 2016 05:56 IST2016-12-22T05:56:50+5:302016-12-22T05:56:50+5:30

महाविद्यालयाने आम्हाला कोणतीही कल्पना न देता आमचे बँक खाते उघडले आणि गेल्या काही दिवसांपासून खाते उघडण्यासाठी

Students are surprised by opening bank accounts | बँक खाती उघडल्याने विद्यार्थी अचंबित

बँक खाती उघडल्याने विद्यार्थी अचंबित

ठाणे : महाविद्यालयाने आम्हाला कोणतीही कल्पना न देता आमचे बँक खाते उघडले आणि गेल्या काही दिवसांपासून खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि सह्या घेत आहेत. हा प्रकार नेमका काय याबाबत महाविद्यालयातील प्राध्यापकांना विचारल्यास थेट प्राचार्यांशी संपर्क करा, असे सांगत टाळाटाळ करीत आहे असा आरोप जोशी - बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला आहे. मात्र, खाते उघडण्यासंबंधी विद्यार्थ्यांना महाविद्यालय सुरू होतानाच इत्यंभूत माहिती दिल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच, उघडण्यात आलेले खाते हे विद्यार्थ्यांच्या सोयीचे असल्याचे स्पष्टीकरण महाविद्यालय प्रशासनाने दिले आहे.
गोपीनाथ पाटील पारसिक जनता सहकारी बँक, नौपाडा शाखा या बँकेकडून काही दिवस खाते उघडल्यासंबंधी मोबाईलवर संदेश येत होते. मात्र आम्ही कोणतेही खाते उघडले नसताना आमचे खाते कसे उघडले गेले याबाबत चर्चा सुरू झाली. त्यादरम्यान, महाविद्यालयाने खाते उघडण्यासंदर्भातली आवश्यक कागदपत्रे आणि सह्या घेण्याचे काम सुरू केले. यावेळी जून महिन्यातच आमचे खाती उघडली गेली असून त्याची आवश्यक कागदपत्रे आता घेत असल्याचे लक्षात आले. याआधी आम्हाला कोणतीही कल्पना देण्यात आली. त्यामुळे ही खाती कशासाठी उघडली हे आम्हाला माहित नसल्याचे जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तसेच, खाते हे जूनमध्ये उघडण्यात आल्याची तारीख पासबुकवर आहे मग आता सह्या कसल्या घेतात. तसेच, पासबुकवर नॉमिनेशन रजिस्टर्ड असेही छापण्यात आले असून आमचे नॉमिनी कोण होते असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत. यासंबंधी प्राध्यापकांना काहीही विचारले की, प्राचार्यांशी थेट बोला असे सांगतात असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच, त्यासोबत देण्यात येणारे एटीएमचा कार्ड हे ओळखपत्र म्हणून वापरता येईल. कॅन्टीनमध्येही ते वापरु शकता, असे महाविद्यालयाने सांगितले. कॅन्टीनमध्ये विचारल्यावर हे कार्ड आम्ही चालवून घेणार नाही असे सांगितल्याचेही विद्यार्थी म्हणतात.
विद्यार्थ्यांच्या खात्यांची माहिती त्यांना महाविद्यालय सुरू होतानाच दिली होती. महाविद्यालयाच्या व्यवस्थापकांनी पारसिक बँकेशी याबाबत करार केला आहे. या करारानुसार आधी खाती उघडायची आणि आवश्यक कागदपत्रे आली की खाते सुरू करायचे, असे ठरले असल्याने त्यांची खाती सुरू करण्यासाठी आता त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: Students are surprised by opening bank accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.