ठाण्यातील अवैध वाहतुकीवर ‘आरटीओ’ची धडक कारवाई
By Admin | Updated: December 22, 2016 05:59 IST2016-12-22T05:59:53+5:302016-12-22T05:59:53+5:30
अवैध वाहतूक रोखण्यासाठी ठाण्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाने बुधवारी धडक मोहीम राबवून

ठाण्यातील अवैध वाहतुकीवर ‘आरटीओ’ची धडक कारवाई
ठाणे : अवैध वाहतूक रोखण्यासाठी ठाण्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाने बुधवारी धडक मोहीम राबवून तब्बल ५५ वाहनांवर कारवाई केली. त्यापैकी ४२ वाहने जप्त केली असून यामध्ये काही स्कूल बसेसचाही समावेश आहे.
नियमांचे उल्लंघन करून बिनदिक्कतपणे रस्त्यावर धावणाऱ्या प्रवासी आणि मालवाहू वाहनांवर कारवाई करण्यासाठी ‘आरटीओ’ विशेष मोहीम राबवली. क्षमतेपेक्षा जास्त वजनाचा माल भरलेली वाहने तसेच टप्पा पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर यावेळी कारवाई केल्याची माहिती ठाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली. या मोहिमेंतर्गत एकूण ५५ वाहनांवर कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करून टप्पा पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी लक्झरी बसेस तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी खबरदारी न घेणाऱ्या काही स्कूलबसेसही या वेळी जप्त केल्या. जप्त केलेली वाहने साकेत परिसरातील मैदानामध्ये ठेवली आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. (प्रतिनिधी)