झोपड्या पाडण्याच्या ठरावाविरोधात धडक मोर्चा
By Admin | Updated: December 27, 2016 01:56 IST2016-12-27T01:56:46+5:302016-12-27T01:56:46+5:30
ठाणे महानगर पालिकेने कळवा प्रभाग समितीच्या अंतर्गत येणाऱ्या झोपड्या पाडण्याचा ठराव पारीत केला आहे. या ठरावाच्या निषेधार्थ कळवा मुंब्रा येथील राष्ट्रवादीचे आमदार

झोपड्या पाडण्याच्या ठरावाविरोधात धडक मोर्चा
ठाणे : ठाणे महानगर पालिकेने कळवा प्रभाग समितीच्या अंतर्गत येणाऱ्या झोपड्या पाडण्याचा ठराव पारीत केला आहे. या ठरावाच्या निषेधार्थ कळवा मुंब्रा येथील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी कळवा नाका येथे धडक मोर्चाचे आयोजन केले होते. या झोपड्यांवर कारवाई झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी आव्हाड यांनी दिला.
या ठरावाच्या निषेधार्थ सुमारे ३५ हजार झोपडीधारकांनी कळवा नाका येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला उद्बबोधन करतांना आव्हाड यांनी शिवसेना- भाजपवर चांगलीच टीका केली.
ठामपाने ठाण्यातील झोपड्यांवर कारवाईचा निर्णय घेतल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवून या कारवाईला स्थगिती मिळविली होती. मात्र, महासभेमध्ये सेना- भाजपने ठराव करु न या झोपड्यांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्याच निर्णयाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. मनिषा नगर, जानकीनगर, खारीगाव, घोलाईनगर, आतकोनेश्वर नगर येथील सुमारे ३० ते ३५ हजार नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मनिषा नगरमधून या मोर्चाला सुरु वात झाली. एकाचवेळी खारीगाव, मनिषानगर, कळवा या भागातून मोर्चात नागरिक सहभागी झाल्यामुळे नवी मुंबई आणि रेतीबंदरकडे जाणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती.
आव्हाड यांनी पालिका प्रशासनावर सडकून टीका केली. २००० पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचा कायदा असतांनाही ८० वर्षांपूर्वीच्या झोपड्या पाडण्याचा घाट घातला आहे. शहर सुंदर करण्याच्या नादात सत्ताधारी रहिवाशांना बेघर करीत आहेत. मात्र, या भागातील एकही झोपडी तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरु. गोरगरिबांना बेघर केले तर ते बंड केल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.