बलात्काराच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:43 IST2021-09-26T04:43:44+5:302021-09-26T04:43:44+5:30
कल्याण : डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी शनिवारी कल्याणमध्ये भाजप आणि ...

बलात्काराच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा
कल्याण : डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी शनिवारी कल्याणमध्ये भाजप आणि मनसेतर्फे निदर्शने करण्यात आली.
भाजप महिला आघाडीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यात कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, माजी उपमहापौर विक्रम तरे, माजी परिवहन समिती सुभाष म्हस्के, माजी नगरसेविका मोनाली तरे, वंदना मोरे, ॲड. राखी बारोद, नितेश म्हात्रे, गुड्डू खान आदी सहभागी झाले होते. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत असल्याने शक्ती कायदा लवकर मंजूर करावा, अशी मागणी महिला आघाडीने केली.
दुसरीकडे शिवाजी चौकात मनसेतर्फे निदर्शने करण्यात आली. बलात्कार प्रकरणातील आरोपींना मनसेच्या ताब्यात द्या. सरकारला काही करता येत नसेल, तर मनसे काय करायचे ते करेल. आरोपींना फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे, अशी मागणी मनसेने केली. या निदर्शनात मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, पदाधिकारी रोहन अक्केवार, रोहन पवार, शीतल विखणकर आदी सहभागी झाले होते.
तरुणी पुढे आल्याने प्रकार उघड : सवालाखे
काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सवालाखे यांनी शुक्रवारी सायंकाळी मानपाडा पोलीस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्या म्हणाल्या की, ‘पीडित तरुणी तक्रार देण्यासाठी पुढे आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. अन्यथा, तिच्यावर आणखीन अत्याचार होत राहिला असता. समाजातील पीडित, अत्याचारित महिलांनी तक्रार देण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्याचबरोबर आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांनी गस्त वाढविली पाहिजे. पोलीस ठाण्यात महिलांच्या तक्रारी घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष असला पाहिजे.’
खटला फास्ट ट्रॅकवर चालवा : रिपाइं
डोंबिवली बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे. सरकारने हा खटला फास्ट ट्रॅकवर चालविला पाहिजे. सहा महिन्यांत आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे यांनी शुक्रवारी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्याकडे केली आहे.
--------------------