-धीरज परबमीरारोड - भाईंदर मध्ये रात्री नऊच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वादळी वारा आल्याने लोकांची एकच तारांबळ उडाली. वाऱ्यासह धूळ देखील मोठ्या प्रमाणात हवेत उडाल्याने धुळीचा त्रास लोकांना सहन करावा लागला. भाईंदर पश्चिमेस मुख्य रेल्वे स्थानक मार्गावर स्कायवॉक जवळ मोठे झाड रस्त्यावर पडले. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. मात्र झाड रस्त्यावर आडवे पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिसरातील नागरिकांनी आणि त्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन झाड बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीत सीएनजी दाहिनी ची चिमनी वादळी वाऱ्यामुळे कोसळून खाली पडली. सुदैवाने आजूबाजूच्या घरांवर व रस्त्यावर चिमनी पडली नाही अन्यथा मोठी जीवित हानी होण्याची शक्यता होती. या ठिकाणी स्मशानभूमीतील अन्य चिमन्या देखील वादळी वाऱ्याने डुलत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण झाले.