भार्इंदर : पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी आपल्याला धक्काबुक्की झाल्याची तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करत श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली. याच्या निषेधार्थ शुक्रवारी दुुपारी काशिमीरा येथे रास्ता रोको करण्यात आला. अंगणवाडी, बालवाडीसेविका, पोषण आहार आदी समस्या मार्गी न लागल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी पंडित यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या वेळी चौधरी यांनी मोर्चेकऱ्यांना प्रतिसाद न देता काढता पाय घेतला. संतप्त मोर्चेकऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, चौधरी यांनी मोर्चेकऱ्यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा खोटा आरोप करून संघटनेच्या सुमारे ४० कार्यकर्त्यांसह पंडित यांच्यावर गुन्हा दाखल केला. श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी काशिमीरा हद्दीतील पश्चिम महामार्गावर रास्ता रोको केला. या वेळी वाहतूककोंडी झाली. वरसावे पुलाच्या दुरुस्तीमुळे कोंडी होत आहे. त्यात रास्ता रोकोची भर पडली. वरसावे वाहतूक जंक्शन ते दहिसर चेकनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. संघटनेकडून विभागीय पोलीस अधिकारी नरसिंग भोसले यांना निवेदन देण्यात आले. श्रमजीवी कामगार संघटनेचे मीरा-भार्इंदर अध्यक्ष मंगेश पाटील, प्रमुख संघटक हरीश शिप्रे, उपाध्यक्ष जयंती पाटील, सचिव रत्नाकर पाटील, श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र गायकर, नंदा वाघे सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
श्रमजीवीचा काशिमीरा येथे रास्ता रोको
By admin | Updated: April 29, 2017 01:33 IST