रिक्षाचालकांकडून एसटीचालकाला ठाण्यात मारहाण
By Admin | Updated: February 12, 2017 05:46 IST2017-02-12T05:46:26+5:302017-02-12T05:46:26+5:30
भिवंडीत रिक्षाचालकांनी केलेल्या मारहाणीत एसटीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, शनिवारी दुपारी ठाण्यात दोन ते तीन रिक्षाचालकांनी एसटीचालकाला मारहाण

रिक्षाचालकांकडून एसटीचालकाला ठाण्यात मारहाण
ठाणे : भिवंडीत रिक्षाचालकांनी केलेल्या मारहाणीत एसटीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, शनिवारी दुपारी ठाण्यात दोन ते तीन रिक्षाचालकांनी एसटीचालकाला मारहाण केली. मारहाणीनंतर ते रिक्षाचालक पळून गेले असून या घटनेतून रिक्षाचालकांची दादागिरी वाढल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
पनवेल-ठाणे ही एसटी बस घेऊन एसटीचालक एस. ए. खरात हे शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ठाण्यात येत होते. याचदरम्यान, कोर्टानाका येथे आल्यावर स्टॉपवर एसटी उभी करताना तेथे रिक्षा उभी करून बसलेल्या रिक्षाचालक आणि खरात यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी अन्य रिक्षाचालक आल्यावर त्यांनी खरात यांना मारहाण केली.
त्यानंतर, ते पळून गेल्याची तक्रार त्याच एसटी बसचे वाहक प्रशांत जाधव यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ही बस ठाणे एसटी डेपोची असून याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी फरार रिक्षाचालकांवर गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.व्ही. धर्माधिकारी यांनी दिली. (प्रतिनिधी)