उल्हासनगरात ८ महिन्यात ६ हजार श्वानाचे निर्बीजीकरण
By सदानंद नाईक | Updated: October 17, 2023 17:25 IST2023-10-17T17:25:37+5:302023-10-17T17:25:56+5:30
उल्हासनगरात श्वानाने चावा घेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने, कुत्र्यांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी महापालिकेने श्वानाचे निर्बीजीकरण करण्यासाठी खाजगी संस्थेला ठेका दिला.

उल्हासनगरात ८ महिन्यात ६ हजार श्वानाचे निर्बीजीकरण
उल्हासनगर : शहरातील श्वानाच्या संख्येवर अंकुश ठेवण्यासाठी महापालिकेने फेब्रुवारी पासून श्वानाचे निर्बीजीकरण सुरू केले. ८ महिन्यात ६ हजार पेक्षा जास्त श्वानाचे निर्बीजीकरण करूनही कुत्र्यांचा सुळसुळाट असल्याचे चित्र शहरात आहे.
उल्हासनगरात श्वानाने चावा घेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने, कुत्र्यांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी महापालिकेने श्वानाचे निर्बीजीकरण करण्यासाठी खाजगी संस्थेला ठेका दिला. फेब्रुवारी महिन्यात श्वानाच्या निर्बीजीकरण करण्याला सुरवात झाली. गेल्या आठ महिन्यात ६ हजार पेक्षा जास्त श्वानाचे निर्बीजीकरण झाल्याची माहिती उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली आहे. महापालिका मुख्यालय मागील एका इमारती मध्ये त्यासाठी विशेष विभाग असून त्याठिकाणी श्वानाचे निर्बीजीकरण प्रक्रिया करण्यात येते. ज्याठिकाणाहून कुत्र्याला पकडून आणले जाते. त्याच विभागात निर्बीजीकरणानंतर सोडण्यात येते. त्यांच्या तब्येतीची विशेष काळजी विभागाद्वारे घेतली जाते. असे डॉ जाधव यांचे म्हणणे आहे.
सन-२०१० च्या पशु जनगणनानुसार शहरात १६ हजार कुत्र्याची नोंद झाली असून शहराच्या क्षेत्रफळानुसार कुत्र्यांची संख्या जास्त असल्याचे बोलले जाते. तसेच शहरात दरमहा ४०० पेक्षा जास्त कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद मध्यवर्ती रुग्णालयात आहे. कुत्र्यांच्या दहशतीमुळे काही ठिकाणी रात्री १० नंतर नागरिक बाहेर जाण्यास धजावत नाही. गेल्या ८ महिन्यात ६ हजार कुत्र्याचे निर्बीजीकरण झाल्यानंतरही त्यांच्या संख्येत कमी झाली. असे चित्र नाही. असे नागरिकांचे म्हणणे आहे. तर १६ हजार श्वानाचे निर्बीजीकरण करण्याचे टार्गेट असल्याचे, आरोग्य विभागाच्या तर्फे सांगण्यात आले.
कुत्र्यांची संख्या घटली... डॉ जाधव
महापालिकेने ८ महिन्यांपूर्वी श्वानाचे निर्बीजीकरण सुरू केले असून आजपर्यंत ६ हजार पेक्षा जास्त कुत्र्याचे निर्बीजीकरण झाले. त्यामुळे कुत्र्यांच्या चावेच्या संख्येत घट झाली. तसेच कुत्रांच्या संख्येतही कमी झाल्याची माहिती उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली आहे.