गावात पाऊल ठेवाल, तर तंगड्या तोडू!
By Admin | Updated: May 22, 2016 01:40 IST2016-05-22T01:40:46+5:302016-05-22T01:40:46+5:30
कल्याण ग्रोथ सेंटरच्या आडोशाने दहा गावांतील स्थानिकांच्या जमिनी हडप करण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे. त्यासाठी गावात पाऊल ठेवले, तर तंगड्या तोडू असा इशारा सर्वपक्षीय हक्क संरक्षण

गावात पाऊल ठेवाल, तर तंगड्या तोडू!
चिकणघर/कल्याण : कल्याण ग्रोथ सेंटरच्या आडोशाने दहा गावांतील स्थानिकांच्या जमिनी हडप करण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे. त्यासाठी गावात पाऊल ठेवले, तर तंगड्या तोडू असा इशारा सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या सभेत देण्यात आला. या गावांतील अतिक्रमणे तोडण्यासाठी कोणी आले, तर त्याचीही तीच गत करू, असे नेत्यांनी बजावले.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्यावेळी २७ गावे महापालिकेतून वगळण्याचे आणि त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन न पाळल्याबद्दल आणि त्यासाठी काम करत असलेल्या लॉबीबद्दल त्यांनी भाजपा सरकार, भाजपाचे नेते आणि शब्द न पाळल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांतील १० गावे एमएमआरडीएकडे सोपवून त्यात ग्रोथ सेंटर स्थापन करण्याची अधिसूचना नुकतीच राज्य सरकारने काढली. त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही सभा बोलवण्यात आली होती.
स्वतंत्र नगरपालिकेचे घोंगडे भिजत ठेवून ग्रोथ सेंटरच्या नवाने २७ गावे तोडण्याचा प्रयत्न सरकार करीत असेल तर त्यास विरोध करण्यासाठी संघर्ष समिती जोरदार आंदोलन करून रस्त्यावर उतरेल, असा इशारा नेत्यांनी दिला. तसेच शिवसेना-बाजपाचे उमेदवार रवींद्र पाटक यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार वसंत डावखरे यांना पाठिंबा दिल्याचा पुरूच्चार केला. या सभेला समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह सहा नगरसेवक उपस्थित होते.
शिवसेनेने स्थानिकांमध्ये भांडणे लावून, तेढ निर्माण करून सत्तेचे राजकारण केले. त्यामुळे आज या २७ गावांची अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी केली. अर्जुनबुवा चौधरी यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री भेटीसाठी समितीला झुलवत ठेवून २७ गावांना महापालिकेत जोडण्याची अधिसूचना शासनाकडून काढून घेतली, असा आरोप केला. मनसेचे प्रतिनिधी प्रकाश माने यांनी संघर्ष समितीच्या भूमिकेला पाठिंबा दिला.
या सभेसाठी २७ गावांतील २२ नगरसेवकांपैकी फक्त सहा नगरसेवक उपस्थित होते. दमयंती वझे, डॉ. सुनीता पाटील, इंदिरा तरे, शैलजा भोईर, जालंदर पाटील, महेश पाटील यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(वार्ताहर/प्रतिनिधी)