बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्याचा ३८ कोटींचा खर्च राज्य सरकार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 07:06 PM2020-09-24T19:06:35+5:302020-09-24T19:26:59+5:30

आता शासनाने सर्व खर्च करण्यास तयारी दाखवल्याने सत्ताधारी भाजपा कुठल्या तोंडाने भूमिपूजनाला येतील? असा सवाल शिवसैनिक करत आहेत.  

The state government will spend Rs 38 crore to set up Balasaheb Thackeray Art Gallery | बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्याचा ३८ कोटींचा खर्च राज्य सरकार करणार

बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्याचा ३८ कोटींचा खर्च राज्य सरकार करणार

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने सतत राखडवत ठेवलेल्या भाईंदर पूर्व येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कला दालनाचा संपूर्ण ३८ कोटी रुपये इतका खर्च आता राज्य शासन करणार आहे. शासनाने या कामासाठी ७ कोटी रुपयांचा निधीसुद्धा वितरीत केला आहे. विशेष म्हणजे १८ सप्टेंबर रोजी ह्या कला दालनाचे भूमिपूजन करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी देखील सत्ताधारी भाजपाने धुडकावून लावली होती. आता शासनाने सर्व खर्च करण्यास तयारी दाखवल्याने सत्ताधारी भाजपा कुठल्या तोंडाने भूमिपूजनाला येतील? असा सवाल शिवसैनिक करत आहेत.  

भाईंदर पूर्वेला आझाद नगर येथे आरक्षण क्रमांक १२२ मध्ये खेळाच्या मैदानातील आरक्षणात १५ टक्के इतकी बांधकाम परवानगी बाळासाहेब ठाकरे कला दालनस मिळाली होती. त्या नंतर राज्य शासनाने देखील मान्यता दिली. या कामासाठी खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक व रवींद्र फाटक आणि प्रभागातील स्थानिक चार शिवसेना नगरसेवकांनी त्यांचा निधी या कामासाठी दिला होता. 

परंतु सत्ताधारी भाजपाने बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या कामात सतत आडकाठी चालवली होती. स्थायी समितीमध्ये निविदा मंजुरीस सतत टाळाटाळ केली होती. त्यावरून शिवसेना नगरसेवकांनी तत्कालीन महापौर डिंपल मेहता यांच्या दालनांची तोडफोड करत तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता, महापौर व भाजपाचा निषेध केला होता. तर नरेंद्र व डिंपल मेहता यांनी थेट शिवसेना, शिवसैनिक व उद्धव ठाकरे यांचे संस्कार काढले होते. भाजपाने दबाव टाकून सेनेच्या सर्व नगरसेवकांवर गुन्हे दाखल करायला लावले. 

शिवसेनेशी उघड घेतलेल्या पंग्याचा फटका मेहतांना विधानसभा निवडणुकीत बसला. युती असूनही शिवसेना नगरसेवक व शिवसैनिकांनी मेहतांच्या विरोधात जाऊन अपक्ष गीता जैन यांना पाठिंबा दिला. पण त्यानंतर देखील महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने बाळासाहेब ठाकरे कलादालनास निधीचे कारण पुढे करून विरोध सुरूच ठेवला होता. सदर कला दालनासाठी पालिका अंदाजपत्रकात पूर्वी केलेली ५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद भाजपाने काढून टाकली. तर १८ सप्टेंबर रोजी भूमिपूजन ठेवण्याची मागणी आ. सरनाईक यांनी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, मेहतांना करून देखील भाजपाने ते केले नाही. उलट महापौरांनी पत्र देऊन या कलादालनाचा खर्च कुठून करणार, असा प्रश्न करत भूमिपूजन होऊ दिले नाही असे आ. सरनाईक म्हणाले. 

मीरा भाईंदर महापालिकेत सत्ता असल्याने बाळासाहेबांच्या कला दालनासाठी सत्ताधारी भाजप खालच्या पातळीचे राजकारण करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने कलादालनासाठी पूर्ण ३८ कोटी निधी राज्य सरकारने टप्प्या-टप्प्याने मंजूर करावा, अशी विनंती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना केली होत. एकनाथ शिंदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी कलादालनाच्या प्रकल्पाला संपूर्ण ३८ कोटीच्या खर्चासह मान्यता दिली आहे, असे आ. सरनाईक म्हणाले. 

इतक्या मोठ्या या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करणे हे आव्हान होते. फडणवीस सरकारने मागणी करून देखील निधी दिला नाही. आता महाविकास आघाडी सरकारने या कलादालनाच्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व खर्चाची हमी घेतली आहे. या कामाचे संकल्पचित्र पूर्णपणे तयार आहे. अत्यंत देखणी व भव्यदिव्य अशी ही वास्तू असणार आहे.  कामाच्या एकूण ३८ कोटीस शासन स्तरावरून मान्यता देण्यात आली असून ७ कोटी उपलब्ध केले आहेत. उर्वरित निधी टप्प्या - टप्प्याने उपलब्ध करून देण्यात येईल, असे नगरविकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात या कलादालनाचे भूमिपूजन केले जाईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

Web Title: The state government will spend Rs 38 crore to set up Balasaheb Thackeray Art Gallery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.