डोंबिवलीत शिवमार्केट प्रभागात १० लाखांच्या गटार-पायवाटांच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 18:53 IST2018-05-29T18:53:38+5:302018-05-29T18:53:38+5:30
पावसाळयात पाणी तुंबू नये यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी परिसरांमधील गटार बांधण्याचे काम वेगाने हाती घेतले आहेत. शिवमार्केट आणि रामनगर प्रभागात ही कामे वेगाने सुरु आहेत.

रामनगरच्या उर्सेकरवाडीतही कामाला सुरुवात
डोंबिवली: पावसाळयात पाणी तुंबू नये यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी परिसरांमधील गटार बांधण्याचे काम वेगाने हाती घेतले आहेत. शिवमार्केट आणि रामनगर प्रभागात ही कामे वेगाने सुरु आहेत.
शिवमार्केटमध्ये टिळकपथ ते सावरकर क्रॉस रोड भागात १० लाखांच्या गटाराचे काम वेगाने सुरु असल्याची माहिती नगरसेवक विश्वदीप पवार यांनी दिली. तसेच रामनगर भागात उर्सेकरवाडी परिसरात गटार बांधण्याचे काम सुरु आहे. उर्सेकर वाडीमध्ये पावसाच्या दिवसात पाणी जमा होते ते होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, गटार बांधतांनाच त्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. नगरसेवक मंदार हळबे यांच्या प्रभागात ते काम सुरु आहे.हा निधी गतवर्षी येणे अपेक्षित होता, परंतू महापालिलेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने यंदा ती कामे करण्यात येत आहेत.
* केळकर रोडवर सीसी रोडचे काम सुरु असून त्या कामामुळेही वाहतूक कोंडी होत आहे. पुढे पाटकर क्रॉसरोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयासमोरील जागेत काम सुरु आहे. इंदिरा गांधी चौकातील पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असून अन्य काम जलद व्हावे, अशी मागणी वाहनचालकांसह पादचा-यांनी केली. परंतू हा भाग सर्वाधिक वर्दळीचा असल्याने मध्यरात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरु असल्याने अडथळे येतात. त्यामुळे कामाच्या वेगावर परिणाम होत असल्याचे या ठिकाणच्या कर्मचा-यांनी सांगितले.
* मानपाडा रोडवरील चिपळूणकर क्रॉस रस्त्यालगच्या कल्व्हर्टच्या कामालाही महापालिका प्रशासनाने सुरुवात केली असून आगामी पंधरवड्यात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. महापौरांनी घेतलेल्या स्वच्छता अभियानाच्या शुभारंभाला महापालिकेचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णींसह अन्य अभियंत्यांनी एकत्र येत या कल्व्हर्ट संदर्भात अंतिम निर्णय घेतला. त्यामुळे तीन महिन्यांपासून उघड्यावरील गटाराचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. पण तो पर्यंत तरी उघड्यावरील गटारात असलेल्या घाणीची स्वच्छता वेळचेवेळी करण्यात यावी, तात्पुरते गटार बंद करावे. महापालिका अधिका-यांनी त्याकडेही लक्ष द्यावे अशी माफक अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.