ठाण्यात तातडीने जुनी कोविड हॉस्पिटल सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST2021-04-03T04:36:38+5:302021-04-03T04:36:38+5:30
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी आणि शासकीय रुग्णालयांत बेडच शिल्लक नाहीत. त्यामुळेच पहिल्या लाटेच्या ...

ठाण्यात तातडीने जुनी कोविड हॉस्पिटल सुरू करा
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी आणि शासकीय रुग्णालयांत बेडच शिल्लक नाहीत. त्यामुळेच पहिल्या लाटेच्या वेळी जी कोविड रुग्णालये वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर रोड येथे चालू केली होती, ती तत्काळ पुन्हा त्याच क्षमतेने सुरू करावीत, अशी मागणी काँग्रेसचे संजय घाडीगावकर यांनी ठामपा प्रशासनाकडे केली आहे.
कोरोनाशी संबंधित आरोग्य कर्मचारी तसेच त्यावरील उपचारासाठी लागणारी उपयुक्त औषधे आणि इंजेक्शन, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, जेवण व्यवस्था त्याचबरोबर डॉक्टर आणि परिचारिकांसह ठाण्यातील बाळकूम येथील महापालिकेच्या ग्लोबल कोविड रुग्णालयाप्रमाणे इतरही कोविड रुग्णालये त्याच क्षमतेने सुरू करावीत, असे ठामपा आयुक्तांना दिलेल्या पत्रात घाडीगावकर यांनी म्हटले आहे. तसेच इतर खासगी रुग्णालयांमधील किमान ५० टक्के बेड तरी कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घेतले जावेत. त्यासाठी ठाणे आणि वागळे इस्टेट येथील डॉक्टर संघटनेशी संपर्क साधून खासगी डॉक्टरांचीही मदत घेतली जावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन ठाणे महापालिकेच्या अधिपत्याखाली जास्तीतजास्त खासगी रुग्णालयांत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम तत्काळ सुरू करण्याची मागणीही घाडीगावकर यांनी केली आहे.
-------------------------