उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरू करा - आमदार किणीकर
By सदानंद नाईक | Updated: April 28, 2023 17:49 IST2023-04-28T17:47:56+5:302023-04-28T17:49:17+5:30
नर्सिंग कॉलेज सुरु झाल्यास मध्यवर्ती रुग्णालयासह कामगार रुग्णलाय, महिला प्रसूतीगृह व महापालिका रुग्णालयातील रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे.

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरू करा - आमदार किणीकर
उल्हासनगर : शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची मागणी आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्याकडे केली. नर्सिंग कॉलेज सुरु झाल्यास मध्यवर्ती रुग्णालयासह कामगार रुग्णलाय, महिला प्रसूतीगृह व महापालिका रुग्णालयातील रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे.
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालय हे २०२ खाटाचे असून लवकरच रुग्णलाय ३५० खाटामध्ये वर्ग होणार आहे. रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, वांगणी, बदलापूर, अंबरनाथ व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी, रुग्णालय शेजारील मोकळ्या भूखंडावर मेडिकल कॉलेज व नर्सिंग कोर्स सुरू करण्याची मागणी जुनी आहे. दरम्यान आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी मेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची मागणी शासनाकडे लावून धरली असून त्यातील प्रस्तावित मेडिकल कॉलेजला अंबरनाथ येथे मंजुरी मिळाली. तर नर्सिंग कॉलेजची मागणी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्याकडे लावून धरल्याने, लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आमदार किणीकर त्यांनी व्यक्त केली.
शहरात जिल्हास्तरीय मध्यवर्ती रुग्णालय, कामगार रुग्णालय, शासकीय महिला प्रस्तुतीगृह व महापालिकेचे २०० बेडचे रिजेन्सी अंटेलिया येथील मात्र गेल्या दोन वर्षांपासून उदघाटनाच्या प्रतिक्षेत असलेले रुग्णालय आहे. असे चार मोठे रुग्णालय शहरात असल्याने नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची मागणी होत आहे. तसेच भविष्यातील सुखसुविधेचा विचार करता अंबरनाथ येथे प्रस्तावित असलेले मेडिकल कॉलेज उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालय शेजारील मोकळ्या भूखंडावर सुरू करण्याच्या मागणीला जोर धरला आहे. मध्यवर्ती रुग्णालय शेजारी मेडिकलसह नर्सिंग कॉलेज सुरू झाल्यास उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, वांगणी, मुरबाड, शहापूर आदी भागातील रुग्णांना व विद्यार्थाना लाभ मिळणार आहे. या भागातील नर्सिंग कोर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मध्यवर्ती रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची मागणी होत आहे.