कालगुडेच्या पूर्वीच्या गुन्ह्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात

By Admin | Updated: February 28, 2016 01:42 IST2016-02-28T01:42:11+5:302016-02-28T01:42:11+5:30

ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस हवालदाराच्या अंगावर हात टाकणारा शिवसेनेचा शाखाप्रमुख शशिकांत कालगुडे याच्यावर यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांचे पुरावे गोळा करण्याचे

Start collecting information about previous crimes in Kargiga | कालगुडेच्या पूर्वीच्या गुन्ह्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात

कालगुडेच्या पूर्वीच्या गुन्ह्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात

ठाणे : ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस हवालदाराच्या अंगावर हात टाकणारा शिवसेनेचा शाखाप्रमुख शशिकांत कालगुडे याच्यावर यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांचे पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. त्यातील काही प्रकरणांत तो जामिनावर बाहेर असला, तरी त्याचा जामीन रद्द करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. हे प्रकरण ‘फास्ट ट्रॅक’वर आणण्याची गरज असल्याचा सूर पोलीस दलात उमटू लागला आहे.
कालगुडेने गुरुवारी नितीन कंपनी येथे महिला पोलीस हवालदाराला केलेल्या मारहाणीप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करून त्याला त्याच दिवशी नौपाडा पोलिसांनी अटक केली. तेव्हा त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. दुसऱ्या दिवशी त्याच्याविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केल्याने तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याचदरम्यान, त्याने केलेल्या त्या मारहाणीचे सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांत संतापाची लाट पसरली. तसेच राजकारणही सुरू झाले.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या कालगुडे याच्याविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात तीन मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्याबाबतची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. तेव्हा तो जामिनावर बाहेर आला असेल तर कोणत्या मुद्द्याखाली, याची माहिती घेण्यात येत आहे. त्या वेळी जामिनावर बाहेर येताना त्याने लिहून दिलेले प्रतिज्ञापत्र (बॉण्ड) रद्द करण्याची शक्यताही पोलिसांकडून वर्तविली जात आहे.
मारहाणप्रकरणी फक्त कारवाई करून न थांबता हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर येणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहितीही वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Start collecting information about previous crimes in Kargiga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.