तारांगण निवडणूक रिंगणाबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 12:00 AM2019-10-17T00:00:50+5:302019-10-17T00:00:58+5:30

कलाकार गायब : मतांवर फारसा परिणाम होत नसल्याची उमेदवारांची भावना

Stars are out of the ring of election | तारांगण निवडणूक रिंगणाबाहेर

तारांगण निवडणूक रिंगणाबाहेर

Next

ठाणे : मुंबई व पुण्यात काही उमेदवारांच्या प्रचाराकरिता सनी देओलपासून संजय दत्तपर्यंत काही कलाकार उतरलेले दिसत असताना ठाण्यातील उमेदवारांनीच कलाकारांना रिंगणाबाहेर ठेवल्याची चर्चा आहे. प्रचाराला कलाकार आणला म्हणून मते वाढत नाहीत, असा अनेक उमेदवारांचा पूर्वानुभव असल्याने कलाकारांना प्रचारफेऱ्यांमध्ये आणण्याचे टाळले असल्याची चर्चा आहे.


ठाण्यात मकरंद अनासपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, चिन्मय मांडलेकर, रवी जाधव, विजू माने, जुई गडकरी असे असंख्य कलाकार राहतात. मात्र, त्यापैकी कुणीही एखाद्या उमेदवाराच्या प्रचारफेरीत किंवा सभेत दिसले नाही. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या प्रचारात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील धर्मेश व्यास, त्रिशा शहा, सोनिया शाह आदी कलाकार मंगळवारी सहभागी झाले, तर बुधवारी श्रेयस तळपदे व आदित्य पांचोली यांनी प्रचारात भाग घेतला. मात्र, हा अपवाद वगळता ठाणे व पालघर जिल्ह्यांतील कुठल्याही उमेदवाराने कलाकारांच्या प्रचाराकरिता आधार घेतलेला नाही. कलाकार उमेदवाराच्या मैत्रीपूर्ण संबंधांकरिता येतात किंवा मानधन घेऊन येतात.

शर्मांसारखे अधिकारी हे दीर्घकाळ पोलीस दलात राहिल्यामुळे त्यांचे कलाकारांशी व प्रामुख्याने पेज थ्री वर्तुळात घनिष्ट संबंध आहेत. काही राजकीय नेते कलाकारांना त्यांच्या वैयक्तिक जीवनात वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतात. त्यामुळे मग त्या नेत्याच्या शब्दाखातर त्यांना प्रचारात सहभागी व्हावे लागते. मात्र, कलाकारांना जर पैसे देऊन आणायचे झाले, तर ते एका तासाकरिता ५० हजारांपासून लाख ते दोन लाख रुपये मानधन घेतात. त्यांना येण्याजाण्याकरिता बीएमडब्ल्यू, आॅडी किंवा तत्सम महागड्या मोटारींची व्यवस्था करावी लागते. जेवढ्या कालावधीकरिता पैसे मिळाले आहेत, तेवढा कालावधी पूर्ण होताच कलाकार निघून जातात. कलाकारांना पाहायला लोक जमतात. मात्र, ती गर्दी मतांमध्ये परावर्तित होईल, याची कुठलीही खात्री नसल्याचे अनेक उमेदवारांना आता कळून चुकले आहे.


ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराकरिता तयार केलेल्या एका शॉर्ट फिल्ममध्ये कुशल बद्रिके दिसतात. त्याखेरीज, मुंब्रा-कळवा मतदारसंघात दीपाली सय्यद या अभिनेत्री रिंगणात असूनही तेथे कुणी कलाकार सय्यद यांच्या मदतीला आल्याचे दिसत नाही. मनोज तिवारी व रवी किशन हे भोजपुरी कलाकार काही उमेदवारांच्या प्रचाराकरिता ठाण्यात पायधूळ झाडून गेले.


उमेदवार सक्षम असल्याने दुर्लक्ष
ठाण्यातील बहुतांश लढती थेट असून तेथे महायुतीच्या नेत्यांनीही खूप लक्ष केंद्रित केलेले नाही. उमेदवार हे स्वत:च्या बळावर आपली लढाई लढण्यास सक्षम असल्याचा विश्वास कदाचित नेत्यांना वाटत असल्याने नेतेच प्रचारात तुरळक दिसत असतील, तर प्रचाराकरिता कलाकारांची जोड घेण्याची गरज वाटलेली नसेल. याखेरीज, अनेकदा उमेदवारांच्या प्रचारफेऱ्यांचे वेळापत्रक विस्कळीत झालेले असते. कलाकार बोलवला आणि त्याला तास-दोन तास ताटकळत बसावे लागले, तर तो नाराज होतो, ही अडचण असल्याचे काही पदाधिकाºयांनी सांगितले.
 

सध्या सर्वच कलाकारांकडे भरपूर काम आहे. त्यामुळे त्यांना वेळ नाही. कुठलाही कलाकार जर बोलवायचा असेल, तर दीड ते दोन महिने अगोदर त्याची तारीख पक्की करावी लागते. ते निवडणूक काळात शक्य नाही. शिवाय, एका विशिष्ट पक्षाच्या अथवा उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होऊन स्वत:वर पक्षाचा स्टॅम्प लावून घेण्यामुळे कलाकारांची अडचण होते. कारण, कलाकारांचे सर्वच पक्षांत मित्र असतात व त्यांना कधीही कुणाच्याही मदतीची गरज लागू शकते. पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सादरीकरणाकरिता हजेरी लावणे व पक्षाला मते देण्याचे आवाहन करण्याकरिता उपस्थित राहणे, या दोन भिन्न बाबी आहेत.

- विजू माने, चित्रपट दिग्दर्शक

Web Title: Stars are out of the ring of election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.