गृहप्रदर्शनामुळे क्रीडा संकुलाची दुरवस्था

By Admin | Updated: October 14, 2016 06:24 IST2016-10-14T06:24:19+5:302016-10-14T06:24:19+5:30

अंबरनाथ आणि बदलापूर परिसरांतील गृहसंकुलांचे नुकतेच प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी कात्रप विद्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुलाचे मैदान

Sports Complex Due to Home-Show | गृहप्रदर्शनामुळे क्रीडा संकुलाची दुरवस्था

गृहप्रदर्शनामुळे क्रीडा संकुलाची दुरवस्था

पंकज पाटील / अंबरनाथ
अंबरनाथ आणि बदलापूर परिसरांतील गृहसंकुलांचे नुकतेच प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी कात्रप विद्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुलाचे मैदान दिले होते. हे मैदान सुस्थितीत ठेवण्याची अट घातली होती. मात्र, तरीही आयोजकांनी या मैदानाची दुरवस्था केली आहे. मैदानाचे सपाटीकरणही खराब झाल्याने क्रीडापटूंना वापरण्यायोग्य हे मैदान राहिलेले नाही. गृहप्रदर्शन आयोजकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्यावर असलेल्या तालुका क्रीडा संकुलावर अनेक खेळाडू हे नियमित खेळण्यासाठी येतात. पावसाळा असल्याने या क्रीडा संकुलाचा वापर चार महिने होत नाही. मात्र, दसरा उलटल्यावर या मैदानाची स्वच्छता स्वत: क्रीडा रसिक करतात आणि ते मैदान खेळण्यासाठी पूर्ववत करतात. या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी अनेक खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. क्रिकेटचे सामने येथे होतात. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मोठी मैदाने कमी असल्याने अनेकजण याच ठिकाणी सरावासाठी येतात. फुटबॉल असो वा क्रिकेट या सर्वांचे सरावही या क्रीडा संकुलात होतात. एवढेच नव्हे तर धावण्याचा सरावही येथे केला जातो. त्यामुळे जिल्हा क्रीडा विभागाचे या मैदानाकडे दुर्लक्ष असले तरी या मैदानाचा वापर मात्र नियमित केला जात आहे. असे असतानाही जिल्हा क्रीडा विभागाने या मैदानाची दुरवस्था सुधारण्याऐवजी आहे त्या मैदानाची अवस्थाही खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. मैदानाचा वापर क्रीडा रसिक करत असतानाही हे मैदान गृहप्रकल्प प्रदर्शनासाठी दिले होते. प्रदर्शन जरी तीन दिवस असले तरी या मैदानाचा ताबा २० दिवसांपासून प्रदर्शन आयोजकांकडे आहे. प्रदर्शनासाठी वातानुकूलित शामियाना उभारण्यात आल्याने त्याचे पिलर उभे करण्यासाठी मैदानात मोठे खड्डे खोदण्यात आले. लोखंडी कॉलम घेऊन अनेक जड वाहने या मैदानात आल्याने मैदानातील मातीत गाड्यांचे चाक रुतून मोठे खड्डे पडले आहेत.
प्रवेशद्वारावरच अनेक वाहनांच्या चाकांचे ठसे उमटल्याने त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसाच प्रकार मैदानाच्या मध्यभागी झाला आहे. या ठिकाणची सर्व माती बाहेर निघाली आहे. अनेक ठिकाणी फुटलेल्या काचांचा ढीग पडलेला आहे. मैदानाच्या मध्यभागीच काचा टाकण्यात आल्याने खेळाडूंना त्या लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर प्लाय आणि प्लायला असलेले खिळेही मैदानात फेकून दिले आहेत. पत्र्यांची शेडही तशीच फेकून दिली आहे. कचराही तसाच टाकून ठेवला आहे.
मैदानाची दुरवस्था करून ठेवलेली असतानाही या आयोजकांना कोणतीही ताकीद क्रीडा विभागाने दिलेली नाही. नाममात्र भाड्यावर हे मैदान गृहप्रदर्शनासाठी दिले. मात्र, त्यामुळे मैदानाचा केवळ गैरवापर झाल्याचे दिसत आहे. प्रदर्शनानंतर हे मैदान आता खेळाडूंसाठी धोकादायक ठरणारे आहे. तसेच मैदानाचे सपाटीकरण केल्याशिवाय ते वापरणे योग्य होणार नाही.
क्रीडा संकुलाची जागा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी देताना अनेक अटी घालण्यात येतात. मात्र, या अटीच पायदळी तुडवत आयोजकांनी या मैदानाची दुरवस्था केली आहे. या प्रदर्शनानंतर या ठिकाणी सरावासाठी येणारे खेळाडू मात्र नाराज झाले आहेत.

Web Title: Sports Complex Due to Home-Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.