माहेरवाशिणीसह बाप्पांना भावपूर्ण निरोप
By Admin | Updated: September 11, 2016 02:08 IST2016-09-11T02:08:01+5:302016-09-11T02:08:01+5:30
पालघर जिल्ह्यामध्ये शनिवारी गौरी सह गणपती बाप्पांचे वाजत गाजत विसर्जन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणांसह गुलालच्या उधळणीने

माहेरवाशिणीसह बाप्पांना भावपूर्ण निरोप
पालघर जिल्ह्यामध्ये शनिवारी गौरी सह गणपती बाप्पांचे वाजत गाजत विसर्जन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणांसह गुलालच्या उधळणीने सर्व परिसर दणाणून गेला होता. माहेरवाशीण गौरी सोबत बाप्पाच्या जाण्याने अनेक भक्तांना आपले आश्रू अनावर झाले होते. स्थापने पासून घरोघरी मोठी लगबग सुरु होती. कुठे गोडधोड पदार्थ तर कुठे झिम्मा फुगडीची सलामी असे भारलेले वातावरण होते. बोल बोलता हे सहा दिवस कसे निघुन गेले ते कळलेच नाही. विसर्जनाच्या क्षणी भक्तांनी डोळ्यात प्राण आणून बाप्पांना लवकर येण्याचा निरोप दिला.
वसई : वसई तालूक्यातील सहा दिवसांच्या गणेशमूर्तीचे शनिवारी वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. सहा दिवसांनी विसर्जन होणाऱ्या गणेशमूर्तीची संख्या मोठी असल्याने जिल्ह्यात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. वसई-विरार अग्निशमन दल, आपत्कालिन पथक व महापालिकेनेही गणेश विर्सजनासाठी चोख तयारी केलीली दिसून येत होती. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवलेला होता.
वसईतील अर्नाळा परिसरात समुद्रकिनाऱ्यावर जिवरक्षक बचाव पथके तैनात करण्यात आली होती.तसेच समुद्रकिनारीही घरगुती व सार्वजनिक मंडळांचे विसर्जन करण्यात आले. वसईत अनेक ठिकाणी श्रीगणेशासोबत गौराईलाही निरोप देण्यात आला. सहा दिवस अभ्यंग, पंचामृत, धूप, दीप, मोदकांचा नैवद्य असा भक्तांचा पाहुणचार घेऊन श्रीगणेशाने शनिवारी निरोप घेतला. दुपारनंतर वसई तालूक्यातील अनेक तलावांवर, तालुक्यातील खाडीकिनारी व विसर्जनस्थळी गणपती बाप्पा मोरयाच्या,पुढल्या वर्षी लवकर या..! जयघोषात गौरी -गणपतींच्या मिरवणुका दाखल होणे सुरू झाले होते. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी वसईत विसर्जनस्थळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
सहा दिवसांनी बाप्पांला निरोप देताना भक्तांना गहीवरून आले होते. अखेर शेवटची मंगल आरती आटोपून बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असे आग्रहाचे निमंत्रण देऊन साश्रुनयनानी बाप्पांना निरोप देण्यात आला.