बेकायदा बॅनर्सवर नजर ठेवण्यासाठी विशेष क्रमांक
By Admin | Updated: December 19, 2014 01:26 IST2014-12-19T01:26:18+5:302014-12-19T01:26:18+5:30
बॅनरबाजांवर नजर ठेवून त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी अखेर न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर पालिकेने हेल्पलाइन आणली आहे़

बेकायदा बॅनर्सवर नजर ठेवण्यासाठी विशेष क्रमांक
मुंबई : बॅनरबाजांवर नजर ठेवून त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी अखेर न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर पालिकेने हेल्पलाइन आणली आहे़ मात्र या विशेष क्रमांकाबाबत अद्याप लोकांना फारशी माहिती नसल्याने दहा दिवसांत २२ तक्रारीच दाखल झाल्या आहेत़ मुंबईत रस्ते, चौक, नाक्यांवर झळकणाऱ्या होर्डिंग्जमध्ये ८० टक्के बेकायदेशीर असतात़ या जाहिरातबाजीतून पालिकेला महसूल मिळत नाही, याउलट शहराचे सौंदर्यही बाधित झाले आहे़ या प्रकरणी उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मुंबईला बॅनरबाजीतून मुक्त करण्याचा निर्धार आयुक्त सीताराम कुंटे यांनी अर्थसंकल्पातून केला़ त्यानुसार बॅनरबाज राजकीय पक्षांविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यासही सुरुवात झाली़
राजकीय बॅनर्सवर बंदी आणणारे धोरणच प्रशासनाने तयार केले़ मात्र राजकीय अनास्थेमुळे अद्याप या धोरणावर शिक्कामोर्तब झालेले नाही़ त्यामुळे निवडणुकीच्या काळात राजकीय बॅनरयुद्धच मुंबईत रंगले़ यावर तीव्र पडसाद उमटताच पालिका प्रशासनाने १२९२ हा विशेष क्रमांक ६ डिसेंबरपासून सुरू केला आहे़ त्यानुसार आपल्या वॉर्डात अनधिकृत बॅनर्स
दिसल्यास त्याबाबत नागरिकांना तत्काळ या क्रमांकावर तक्रार करता येणार आहे़ राजकीय जाहिरातींची डोकेदुखी
नेत्यांच्या वाढदिवसांच्या
शुभेच्छा, जयंती, पुण्यतिथी, नियुक्त्या अथवा सण-उत्सवाच्या शुभेच्छा, मेळावे अशी राजकीय पक्षांची जाहिरातबाजी शहरभर सुरू असते़ या वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुका असल्याने आपले दिखाऊ काम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बॅनर्स लावण्यात राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू होती़ त्यानंतर आता विजयी उमेदवारांना शुभेच्छ, मतदारांचे आभार अशा जाहिरातबाजीने मुंबईला विद्रूप केले आहे़ (प्रतिनिधी)