पगार होताच पुन्हा एटीएममध्ये खडखडाट
By Admin | Updated: May 9, 2017 00:16 IST2017-05-09T00:16:39+5:302017-05-09T00:16:39+5:30
नोटाबंदीनंतर चार महिने रोख रकमेच्या चणचणीचा सामना करणाऱ्या नोकरदारांना गेल्या महिन्याप्रमाणे आताही पगार जमा होताच पुन्हा बंद एटीएमचा सामना करावा लागतो आहे.

पगार होताच पुन्हा एटीएममध्ये खडखडाट
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नोटाबंदीनंतर चार महिने रोख रकमेच्या चणचणीचा सामना करणाऱ्या नोकरदारांना गेल्या महिन्याप्रमाणे आताही पगार जमा होताच पुन्हा बंद एटीएमचा सामना करावा लागतो आहे. नो कॅशचे बोर्ड लावलेली एटीएम पुन्हा ग्राहकांना वाकुल्या दाखवून लागली आहेत. अर्थव्यवस्थेपेक्षा एटीएमच कॅशलेस झाली आहेत.
केंद्रातील मोदी करकारने भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या निर्दालनासाठी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला सोमवारी सहा महिने पूर्ण होत आहेत. मात्र अजूनही रोख गंगाजळीची परिस्थिती सुधारलेली नाही, हेच एटीएमच्या खडखडाटातून दिसून आले.
गेल्या महिन्यातच सुट्टीचे नियोजन करून बाहेरगावी जाण्याच्या विचारात असलेल्यांना एटीएमबंदीचा फटका बसला होता. पैशांसाठी रांगा लागल्या होत्या. तशाच रांगा आता पुन्हा लावण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. नोटांची चणचण पुन्हा का सुरू झाली, याचे कारण कोणालाच ठावूक नाही. सध्या सुट्यांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे बाहेरगावी गेलेल्यांची संख्याही मोठी आहे. अशा स्थितीत रोख रकमेची मागणी एरव्हीपेक्षा घटली आहे, तरीही एटीएम यंत्रांत नोटांचा खडखडाट दिसून येतो. त्यामुळे आधी नोटाबंदीच्या काळात चार महिने आणि नंतर दरमहा नोटांच्या शोधात फिरणारे ग्राहक पुन्हा ठाणे, कल्याण, डोंबिवलीत दिसू लागले आहेत.