सामाजिक कार्यकर्ते संजीव साने यांचे निधन

By जितेंद्र कालेकर | Published: October 28, 2022 02:14 PM2022-10-28T14:14:39+5:302022-10-28T14:16:06+5:30

पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते स्वराज्य इंडिया अभियान चे महाराष्ट्राचे महासचिव संजीव साने यांचे निधन झाले.

social activist sanjeev sane passed away in thane | सामाजिक कार्यकर्ते संजीव साने यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते संजीव साने यांचे निधन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते स्वराज्य इंडिया अभियान चे महाराष्ट्राचे महासचिव संजीव साने यांचे शुक्रवारी सकाळी ९ वाजता निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी प्रा. नीता व मुलगा निमिष  असा परिवार आहे.

संजीव साने साथी मधु लिमये जन्मशताब्दी समारोह समितीचे निमंत्रक होते.  त्यांनी आणीबाणी विरोधी कार्यापासून सामाजिक , राजकीय कामाला सुरुवात केली. त्यांनी राष्ट्रसेवा दलाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केले,ते समता आंदोलन, समाजवादी जनपरिषदचे संस्थापक सदस्य व पूर्णवेळ कार्यकर्ते होते.ते एन्रॉन विरोधी कृती समितीचे सह निमंत्रक व रायगड मधील सेझ आंदोलनाचे सह निमंत्रक होते.जागतिकीकरण विरोधी कृती समितीच्या कार्यात ते स्मृतीशेष ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांचे विश्वासू सहकारी होते. त्यांनी जागतिकीकरण विरोधी कृती समितीच्या कार्यात एन.डी. सरांच्या सोबत निमंत्रक म्हणून काम केले आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीचे विश्वस्त होते. त्यांचा विचारवेध संमेलनाच्या आयोजनात महत्त्वाचा सहभाग होता. वडघर ( माणगाव) येथे झालेल्या तेराव्या विचारवेध संमेलनाचे ते संयोजक होते.  त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त आणि कार्याध्यक्ष म्हणून काम केले होते.

वर्ल्ड सोशल फोरम या मुंबईतील कार्यक्रमाचे संयोजक, ठाण्यातील मतदार जागरण अभियानाचे सचिव म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.त्यांनी स्वराज्य इंडिया अभियानतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांतील कॉलेजमध्ये 'बळीराजांची मुले मुली' हा कार्यक्रम घेऊन प्रबोधनाचेही त्यांनी काम केले. 

ते ठाणे येथील वी नीड यू सोसायटीचे सदस्य व कार्याध्यक्ष होते. त्यांनी संस्थेतर्फे पैसे गोळा करून कोरोना काळात कष्टकरी असंघटित वर्गातील सातशे लोकांना एकंदर सहा महिने दररोज जेवण दिले.त्यांनी कोरोना काळात पूर्णवेळ कार्यकर्त्यांसाठी मानधन गोळा करून अर्थसाह्य प्रकल्पही सुरू केला होता. 

त्यांनी चळवळी आणि आंदोलनाच्या निमित्ताने विविध पुस्तकांचे लिखाणतसेच वर्तमानपत्रात सदर लेखन केले आहे. त्यांनी सेवाग्राम कलेक्टिव्ह तर्फे महाराष्ट्रातील पूर्णवेळ शंभर सामाजिक कार्यकर्यांना गांधींजीं विषयी तीन खंड व डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर यांचे मुलांसाठी विवेकानंद आदी विचार प्रवर्तक पुस्तकांच्या प्रती पाठवण्यात पुढाकार घेतला होता. संजीव साने यांनी डॉ. यशवंत सुमंत यांच्यासोबत पुणे येथील  महात्मा फुले वाडा ते गांधींचा वर्ध्याचा आश्रम ' महात्मा ते महात्मा' या ऐतिहासिक पदयात्रेचे  संयोजनात सहभाग घेतला होता. 

संजीव साने यांनी रेमिंग्टन या टाईपरायटर कंपनीत नोकरी केली. मालकांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर आम्ही कर्मचारी कंपनी चालवू असा प्रस्ताव देऊन काही काळ कंपनी चालविली. त्यानंतर नवीन तंत्रज्ञान आल्याने ही कंपनी बंद झाली. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ सामाजिक, राजकीय कार्यात झोकून दिले. त्यांनी आप पार्टीच्या वतीने ठाणे लोकसभा निवडणूक लढवली होती. साने यांना वर्धा येथील दाते संस्थेचे वतीने डॉ.भा.ल. भोळे स्मृती कार्यकर्ता पुरस्कार तसेच निळू फुले स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: social activist sanjeev sane passed away in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे