...म्हणून भाजपाला मुंबईची सत्ता हवी - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: February 10, 2017 08:45 IST2017-02-10T07:29:49+5:302017-02-10T08:45:52+5:30
शिवसेना-भाजपाच्या 25 वर्षाच्या मैत्रीत फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांनी मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणूकीत एकमेंकाच्या विरोधात दंड थोपाटले आहेत.

...म्हणून भाजपाला मुंबईची सत्ता हवी - उद्धव ठाकरे
ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. 10 - शिवसेना-भाजपाच्या 25 वर्षाच्या मैत्रीत फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांनी मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीत एकमेंकाविरोधात दंड थोपाटले आहेत. पारदर्शकता, पालिकेतील भ्रष्टाचार, वांद्रय़ाचा साहेब, पालिकेतील माफियागिरी आदी मुद्दे घेऊन भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले आहे. भाजपाच्या या हल्ल्यानंतर शिवसेनेने आपल्या 'ठाकरी' शैलीत उत्तरे देण्यास सुरुवात केली. शिवसेनेने भाजपाला लक्ष्य करताना नागपूर महानगरपालिकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
तर आजच्या ' सामना'ध्ये संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा सरकारचा कारभार तसेच त्यांच्या धोरणावर ठाकरी शैलीत टीकास्त्र सोडले. भविष्यात भाजपाबरोबर युती करणार नाही असेही त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी युती तुटल्यानंतर कौरव-पांडवाशी तुलना केली होती. यावर उत्तर देताना उद्धव म्हणाले, ' कौरव कोण आणि पांडव कोण यापेक्षा त्यांच्यात मला शिखंडी आणि बृहन्नडाच दिसत आहेत.' तसेच भाजपात सुरु असलेल्या इनकमिंबाबत बोलताना त्यांनी ' भविष्यात भाजपामध्ये दाऊदही दिसेल' असा खोचक टोलाur लगावला.
भाजपाला मुंबईची सत्ता कशाकरता हवी आहे? याचे उत्तर देताना ते म्हणाले, ' गेल्या काही वर्षांतल्या हालचाली पाहता मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्यासाठी भाजपाचा पालिकेवर डोळा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही हे तर नक्कीच. तशी हिंमत कुणी स्वप्नातसुद्धा करू नये. मग काय करायचं? हातात सत्ता आहे ना; तर त्या अधिकाराचा दुरुपयोग करून मुंबईचं महत्त्व कमी करायचं' अशा शब्दांत त्यांनी भाजपाचा डाव स्पष्ट केला.
उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे -
- 92 च्या दंगलीत सगळय़ांच्या शेळय़ा झाल्या होत्या. तेव्हा माझा शिवसैनिकच येथे वाघासारखा लढला. शिवसेना हीच मुंबईची ताकद आहे. ही मुंबईची ताकद खच्ची केली तर आपल्याला मुंबई विनासायास मिळेल अशी स्वप्नं पाहणारे जे कुणी असतील त्यांचं स्वप्न मुंबईकर कधीच पूर्ण करणार नाहीत. शक्यच नाही.
- नागपूरमध्ये शपथ का नाही घेतली? अकोल्यात का नाही घेतली? अमरावतीत का नाही घेतली? सोलापूर आहे, इतरही शहरं आहेतच ना...म्हणजेच त्यांचं टार्गेट फक्त मुंबई आहे शिवसेना आहे.
- आम्ही लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून तुमचा प्रचार केला ना? मग तुमच्यामध्ये एवढाही मोठेपणा का नसावा की, बाबा वाईट काळात आपल्याबरोबर राहिलेला हा मित्र आहे. आपले अच्छे दिन आले म्हणून काय तुम्हाला शिंगं फुटली? लगेच तुम्ही मोठे भाऊ झालात?
- कौरव आणि पांडवांत फ्रेंडली मॅच कशी होईल? कौरव कोण आणि पांडव कोण यापेक्षा त्यांच्यात मला शिखंडी आणि बृहन्नडाच दिसत आहेत!
- मन की बात बोलणं विचित्र वाटतं, पण माझ्या हृदयातली गोष्ट मी बोललो की पंचवीस वर्षे आपली युतीच्या राजकारणामध्ये सडली. पंचवीस वर्षे आम्ही वेडय़ा अपेक्षेने सत्तेची लालसा न धरता काम केले. आजही आम्हाला तशी ती लालसा नाही.
- देशात बदलाव लाना है म्हणजे काय करायचं आहे? राज्यात परिवर्तन पाहिजे. म्हणजे कशात परिवर्तन पाहिजे? नुसत्या सत्ताधाऱयांत नको. देशात परिवर्तन झालं, राज्यात परिवर्तन झालं मग त्यानुसार कारभारात परिवर्तन नको काय? मग हा कारभार तुम्ही बदलणार कसा?
- आम्ही पंचवीस वर्षे जोपासली होती ती युती होती. त्यावेळेला त्यांच्यामध्ये नक्की एक विचार होता, भावना होती. आता हे नुसतं बुद्धिबळ झालेलं आहे. एका हवेवरती सत्ता प्राप्त झाली म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ झालो असं होत नाही.