ठाणे : गाेवा बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या श्रीकांत देवीदास टले याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. त्यांच्याकडून वाहनांसह १८ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
बनावट लेबल लावून महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी तयार केलेला बनावट मद्यसाठा आणि गाेवा राज्यात निर्मित आणि गाेवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्यसाठ्याची कल्याणमधून वाहतूक हाेत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक दाेनच्या पथकाला मिळाली हाेती. त्याच माहितीच्या आधारे १२ जानेवारीला काेकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, ठाण्याचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ, कटाई राेड, नेवाळी नाका भागात भरारी पथकाचे निरीक्षक दीपक परब, दुय्यम निरीक्षक टी. सी. चव्हाण, आदींच्या पथकाने कार थांबवून तपासणी केली असता बनावट विदेशी मद्याचा साठा आढळला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मद्याचे १२६ बॉक्स जप्त
हा मुद्देमाल जागीच जप्त करून बामणे याला चाैकशीसाठी ताब्यात घेतले. बामणे याच्या माहितीच्या आधारे कर्जतमधील माेग्रज येथील आनंदवाडी भागात छापा टाकला.
तेथे गोवा राज्य निर्मित आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला मद्यसाठा मिळाला. या तिन्ही ठिकाणांहून विदेशी, देशी मद्याचे १२६ बॉक्स मिळाले.
दारूबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये वाहनासह १८ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत श्रीकांत, किशोर पाटील आणि प्रदीप बामणे या तिघांना अटक केली.