स्मार्ट ठाणेकरांना पालिका करणार कनेक्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2016 02:31 IST2016-10-14T02:31:29+5:302016-10-14T02:31:29+5:30
ठाणे महापालिकेने आता डिजिटल अर्थात, डीजी ठाणे ही संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार, या संकल्पनेशी जोडल्या जाणाऱ्या ठाणेकरांना स्मार्टकार्डप्रमाणे कार्ड

स्मार्ट ठाणेकरांना पालिका करणार कनेक्ट
ठाणे : ठाणे महापालिकेने आता डिजिटल अर्थात, डीजी ठाणे ही संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार, या संकल्पनेशी जोडल्या जाणाऱ्या ठाणेकरांना स्मार्टकार्डप्रमाणे कार्ड दिले जाणार आहे. या कार्डद्वारे पालिकेची विविध बिले, सिनेमा तिकिटे, शॉपिंग, हॉस्पिटल, नव्या योजना, सामाजिक आशयांच्या कामांसह इतर सेवा मिळणार आहेत. हे कार्ड एटीएम आणि डेबिट कार्डप्रमाणे काम करणार आहे, तसेच या माध्यमातून एक अॅपही पालिका तयार करणार असून, त्याद्वारे शहरातील वाहतूककोंडी, बससेवा आदींसह इतर सेवांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करणार आहे.
इस्रायलमधील तेल अवीव महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिका ही संकल्पना राबवत असल्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले. ठाणेकरांना ठाणेकरांशी, महापालिकेशी आणि खासगी संस्थांशी या माध्यमातून जोडले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा प्रकल्प यशस्वी झाला, तर अशा प्रकारचा प्रकल्प राबवणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.
स्मार्टकार्डप्रमाणे ही सुविधा असल्यामुळे त्यासाठी एचडीएफसी बँकेशी टायअप केले आहे. ते डेबिट कार्डप्रमाणेही वापरता येणार आहे. इतर बँकांनाही यात सामील करून घेतले जाणार आहे.
या कार्डच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येणार असून, शॉपिंग करता येणार आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात बँकेचे व्यवहार सुरू करण्यात येऊन पालिकेचा मालमत्ताकर, पाणीबिल एका स्वॅपवर भरण्याची संधी मिळणार आहे.
यात वैयक्तिक डेटाही उपलब्ध होणार असल्याने व्यक्तीला कशाची आवड आहे, त्याला काय आवडते, याची सर्व माहिती अॅपच्या माध्यमातून घरबसल्या मिळणार आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात व्यक्ती राहत असेल, त्या भागात त्याच्या आवडीच्या कार्यक्रमांची माहिती त्याला मेल, मेसेजच्या माध्यमातून दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)