Smart City 'Global Impact' in the Hand | स्मार्ट सिटी ‘ग्लोबल इम्पॅक्ट’च्या हाती

स्मार्ट सिटी ‘ग्लोबल इम्पॅक्ट’च्या हाती

ठाणे : नवीन उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहन देणे व त्याद्वारे शहराच्या आर्थिक विकासास चालणे देणे हा ग्लोबल स्मार्ट सिटी मिशनचा उद्देश आहे. ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी ग्लोबल स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत ठाणे महापालिकेमार्फत शहरात ग्लोबल इम्पॅक्ट हब उभारले आहे. त्याच्या माध्यमातून महापालिका शहर व आसपासच्या परिसरातील नागरिकांचे राहणीमान उंचावणे, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे व त्याद्वारे शहराचा एकूण आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.

ठाणे महापालिकेस रुस्तमजी गृहसंकुलात साकेत बाळकूम रस्त्यावर टाऊन सेंटर इमारत उपलब्ध झाली आहे. हे टाऊन सेंटर इमारत ग्लोबल इम्पॅक्ट हबसाठी टप्याटप्याने उपलब्ध करून देण्याचे पालिकेने प्रस्तावित केले आहे. या प्रकल्पाचा कालावधी हा ३० वर्षे इतका असणार आहे.

महापालिकेस सध्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे एक लाख २० हजार चौरस फुट जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यापैकी ३० हजार चौरस फुट जागेत पुढील सुमारे सहा महिन्यात ग्लोबल हब कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्तावाला २८ फेब्रुवारी २०१८ च्या महासभेत मंजुरी मिळाली आहे.

आता ग्लोबल इम्पॅक्ट हबची स्थापना करण्यासाठी कंपनी सचिव, विविध तज्ज्ञांची मते, कायदेशीर बाबी तपासणे आदी बाबी प्रस्तावित केल्या आहेत. त्यासाठी या हबची स्थापना लवकरात लवकर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे कंपनीची नियुक्ती होईपर्यंत पुढील दोन वर्षे हे हब चालविण्याचा विडा ठाणे महापालिकेने आपल्या खाद्यांवर उचलला आहे. त्याकरिता पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. त्यानुसार यामध्ये ग्लोबल इम्पॅक्ट हबकरिता व्यावसायिक आराखडा तयार करणे प्रस्तावित केला असून हबची स्थापना तसेच दोन वर्षांच्या कालावधीत परिचलन करण्यासाठी कुशल व्यावसायिक-तांत्रिक मनुष्यबळ व सेवा पुरविणे आदी कामांचा समावेश केला आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेतील सूत्रांनी दिली.

ग्लोबल इम्पॅक्ट हबची उद्दिष्टे
ठाण्यातील हे हब राज्यातील पहिले, तर देशातील दुसरे सर्वात मोठे स्टार्ट अप हब ठरणार आहे. ग्लोबल इम्पॅक्ट हबद्वारे विविध स्तरातील महिलांसाठी प्राधान्याने रोजगार निर्मिती व व्यवसाय चालू करण्यासाठी विशेष सुविधा देणे आदींचा यात समावेश असेल. या हबद्वारे पाच वर्षांत व त्यानंतर पुढील काळात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करणे, शहरात कॉर्पोरेट क्षेत्रातील नामांकित कंपन्यामार्फत संशोधन व विकास सुविधा विकसित करणे, शहरातील अस्तित्वातील उद्योगधंदे, हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट, लघु उद्योगांना चालणे देणे व त्यांच्या व्यवसायात वाढ करणे, नव्या स्टार्ट अपमुळे महापालिकेच्या उत्पन्नात अप्रत्यक्षपणे वाढ होणेदेखील अपेक्षित आहे.

मिळणाऱ्या सेवा
इनोव्हेशन - नवीन व्यवसाय संकल्पना तयार करणे यासाठी नागरिक, युवक, महिला यांना मार्गदर्शन. स्टार्टअप - नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी तांत्रिक, आर्थिक मदत व मार्गदर्शन. इनक्युबेटर - व्यवसायात येणाºया अडचणी सोडविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे. अ‍ॅक्सिलेटर - चालू केलेल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी मार्गदर्शन व सहाय्य करणे. वर्क स्पेस - डेस्क स्पेस - नवीन उद्योजक, यांच्यासाठी कार्यालयाची जागा. हॅकेथॉन - नाविन्यपूर्ण स्फॉटवेअर तयार करणे आदींचा यात समावेश असणार आहे.

Web Title: Smart City 'Global Impact' in the Hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.