वायुप्रदूषणाचे ‘स्लो पॉयझनिंग’ घातक
By Admin | Updated: November 17, 2016 06:57 IST2016-11-17T06:57:11+5:302016-11-17T06:57:11+5:30
मागील आठवड्यात दिल्लीतील वाढलेल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजला. मात्र, एमएमआर रिजनमध्ये सध्या प्रचंड वेगाने विकसित होत

वायुप्रदूषणाचे ‘स्लो पॉयझनिंग’ घातक
मुरलीधर भवार / कल्याण
मागील आठवड्यात दिल्लीतील वाढलेल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजला. मात्र, एमएमआर रिजनमध्ये सध्या प्रचंड वेगाने विकसित होत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बहुतांश परिसरात धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोकांना श्वास कोंडण्याचा त्रास होतो. वेळीच या समस्येवर उपाय केले नाहीत, तर या स्लो पॉयझनमुळे या परिसरातील लोकांचे आयुर्मान कमी होत जाणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
ठाणे, दिवा, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, कल्याण-शीळ रोड, कल्याण-भिवंडी, शीळ, ठाणे-शीळ या परिसरात धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.
ठाणे-कल्याण मार्गावर रेल्वे प्रवास करताना दिवा स्थानक येताच प्रवाशांचा श्वास गुदमरू लागतो. दिवा परिसरातील डम्पिंग ग्राउंडवर दररोज कचरा जाळण्यात येतो. त्यामुळे हा परिसर रात्रीच्या वेळी धुराने वेढलेला असतो. आता थंडीला सुरुवात झाली आहे. पहाटे धुक्याचे प्रमाण जास्त असते. या धुक्याचा गैरफायदा घेत कचरा जाळल्याने धुराचे लोट हवेत जातात. धुके आणि धूर याबाबत दिवावासीयांचा संभ्रम होतो. कचरा जाळण्यावर कोणत्याही सरकारी यंत्रणांचे नियंत्रण नाही. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील विविध दगडखाणींमधील क्रशरमुळे वातावरणात धुलीकणांचे प्रमाण वाढते आहे. कल्याण-शीळ रस्त्यावर धुळीचे प्रमाण इतके आहे की, दुचाकीवरील प्रवासी महिला व पुरुष तोंडाला स्कार्फ बांधल्याखेरीज प्रवास करू शकत नाहीत. डोंबिवलीतील औद्योगिक वसाहतीमधील कारखानेही धुक्याचा फायदा घेऊन प्रचंड प्रमाणात विषारी वायू सोडतात.
रासायनिक कंपन्या योग्य प्रक्रिया न करतासांडपाणी नाल्यात सोडतात. त्याचा दर्प इतका भयानक असतो की, त्यामुळेही नागरिकांना त्रास होतो. डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात ही समस्या तीव्र आहे.
केडीएमसीच्या हद्दीत आधारवाडी डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न ३५ वर्षांपासून गाजत आहे. हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात अद्याप महापालिकेस यश आलेले नाही. या डम्पिंगचा उग्र, घाण वास कल्याण स्टेशन परिसरापर्यंत येत असतो. तसेच डम्पिंगच्या दुर्गंधीने नागरिक नाक मुठीत धरून वास्तव्य करीत आहेत. डम्पिंगवर लागलेल्या आगीचा धूर नागरिकांच्या नाकातोंडात जातो. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न कल्याण, डोंबिवली, दिव्याबरोबर भिवंडीतही आहे. तेथेही डम्पिंगची व्यवस्था नाही. उल्हासनगर महापालिकेने व अंबरनाथ-बदलापूर पालिकांनीही डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रियेचा प्रकल्प उभारलेला नाही.
वालधुनी नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडले जाते. त्या पाण्याचा उग्र दर्प अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याणच्या नागरिकांना सहन करावा लागतो. तोच प्रकार डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाजवळून वाहणारा नाला खंबालपाडामार्गे ठाकुर्ली रेल्वेमार्गाखालून कल्याण खाडीत मिळतो, तेथेही आहे.