पाणीकपातीतून भाईंदरला वगळा
By Admin | Updated: November 9, 2015 02:34 IST2015-11-09T02:34:01+5:302015-11-09T02:34:01+5:30
शहरात सद्य:स्थितीत कोणतीही पाणीकपात लागू नसताना त्याची माहिती नागरिकांना मिळू लागल्याने पाणीसमस्यांच्या गर्तेत सापडलेल्या मीरा-भार्इंदरकरांना

पाणीकपातीतून भाईंदरला वगळा
भार्इंदर : शहरात सद्य:स्थितीत कोणतीही पाणीकपात लागू नसताना त्याची माहिती नागरिकांना मिळू लागल्याने पाणीसमस्यांच्या गर्तेत सापडलेल्या मीरा-भार्इंदरकरांना ऐन सणासुदीच्या दिवसांत पाणीकपातीची धास्ती लागली आहे. या संभाव्य वा लागू केलेल्या कपातीतून वगळण्याची मागणी मीरा-भार्इंदर काँग्रेस शहर जिल्हा कमिटीने पालिकेकडे केली आहे.
झपाट्याने विकसित होत असलेल्या शहराला स्टेमकडून ३० व एमआयडीसीकडून ९६ असा एकूण १३६ एमएलडी पाणीपुरवठा दररोज होेत आहे. तो शहाड, टेमघर येथून होत असून पाणीपुरवठ्याच्या ठिकाणापासून शहर शेवटच्या टोकाला आहे. त्यामुळे प्रत्येक पाणीपुरवठ्यातील अंतर ३० ते ३५ तासांवर जात असून भार्इंदरमधील काही ठिकाणांसह मीरा रोड येथील शांतीनगर सृष्टी, नयानगर आदी परिसरांमध्ये सुमारे ५० ते ६० तासांच्या अंतराने पाणीपुरवठा होत आहे. शहराला सद्य:स्थितीत होणारा पाणीपुरवठा लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा असतानाच शहरांतर्गत पाण्याचे होणारे असमान वाटप समान करणे अपेक्षित आहे. ज्या लोकवस्तींना पाणीपुरवठा होत नाही, त्या ठिकाणी टँकरद्वारे तो होत आहे. अशातच दर गुरुवारी व शुक्रवारी एमआयडीसीकडून तांत्रिक कारणास्तव शटडाऊन घेण्यात येणार असल्याने ४८ तासांसाठी तो खंडित केला जाणार असल्याची माहिती लोकांना देण्यात येत आहे. यामुळे या पाणीकपातीतून शहराला वगळण्याची मागणी काँग्रेसने प्रशासनाकडे केली आहे. गतवर्षी लघुपाटबंधारे विभागाने लागू केलेली १४ टक्के पाणीकपात रद्द केली होती. ती यंदा लागू करण्यात येऊ नये, अशा आशयाचे निवेदन उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांना दिले आहे. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, गटनेते जुबेर इनामदार, नगरसेवक प्रमोद पाटील, दिनेश नलावडे, राजू वेतोस्कर, नगरसेविका सुनीता पाटील आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)