अपहरणप्रकरणी भार्इंदरमधून सहा जण अटकेत

By Admin | Updated: April 29, 2017 01:17 IST2017-04-29T01:17:06+5:302017-04-29T01:17:06+5:30

व्याजाने दिलेल्या १२ लाखांच्या वसुलीसाठी पनवेलच्या दोघा रहिवाशांचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने भार्इंदरमधून सहा जणांना अटक केली.

Six people are arrested from Bhairindar for kidnapping | अपहरणप्रकरणी भार्इंदरमधून सहा जण अटकेत

अपहरणप्रकरणी भार्इंदरमधून सहा जण अटकेत

मीरा रोड : व्याजाने दिलेल्या १२ लाखांच्या वसुलीसाठी पनवेलच्या दोघा रहिवाशांचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने भार्इंदरमधून सहा जणांना अटक केली. उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पनवेलमधील खांदा कॉलनी येथे राहणारे दिनेश रंधेरिया यांनी व्यवसायासाठी संदीप पारकर (३१) याच्याकडून १२ लाख व्याजाने घेतले होते. संदीप पैशांची मागणी करत असताना दिनेश टोलवाटोलवी करत होता. वसुलीसाठी संदीप व त्याच्या साथीदारांनी दिनेशचे खांदा कॉलनी येथून अपहरण केले. दिनेश हवा असेल, तर ५ लाख घेऊन भार्इंदरला पाठवा, असे त्याच्या पत्नीला सांगितले.
दिनेशच्या पत्नीने ही बाब मालेवाडी येथे राहणारे अ‍ॅल्डिसन पोय्याकारण यांना सांगितल्यावर ते मित्रासह दिनेशचा शोध घेत भार्इंदरला आले. दरम्यान, दिनेशचे अपहरण झाल्याचे पोलिसांना सांगितले. मॅक्सस चौकीजवळ पोय्याकरण आले असता त्यांनाही संदीप व त्याच्या साथीदारांनी बळजबरीने गाडीत बसवले. त्याच वेळी गुन्हे शाखेच्या पथकाने दिनेश व पोय्याकरणची सुटका करत संदीपसह शंकर शेलार (२८) व सुशील भागोजी मोरे (२८), रॉजर दिनीस (३०), विशाल मोरे (२७), सचिन पोकरेला (३७) ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Six people are arrested from Bhairindar for kidnapping