अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास सहा महिन्यांचा कारावास
By जितेंद्र कालेकर | Updated: July 17, 2023 21:13 IST2023-07-17T21:13:22+5:302023-07-17T21:13:48+5:30
ठाणे न्यायालयाचा निर्णय: पाच वषार्पूवीर्ची घटना

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास सहा महिन्यांचा कारावास
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्या संजय उर्फ शंकर सिंग या आरोपीला सहा महिन्यांच्या कैदेची तसेच पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने सोमवारी सुनावली आहे. दंड न भरल्यास ५० दिवसांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षाही त्याला सुनावण्यात आल्याची माहिती विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी दिली.
कळव्यातील खारेगाव भागात २०१८ मध्ये ही घटना घडली होती. ११ ऑगस्ट २०१८ रोजी पिडित १३ वर्षीय मुलगी सकाळी ११.५५ वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी परत येत होती. त्यावेळी २२ वर्षीय आरोपी संजय याने तिचा पाठलाग करीत इमारतीच्या लिफ्टमध्ये प्रवेश केला होता. या लिफ्टमध्येच त्याने तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कळवा पोलिसांनी त्याला अटक केली होती. याच खटल्याची सुनावणी १७ जुलै २०२३ रोजी झाली. यामध्ये सात साक्षीदारांची तपासणी विशेष सरकारी वकील हिवराळे यांनी केली. सर्व बाजू पडताळल्यानंतर न्या. व्ही. व्ही. विरकर यांनी त्याला सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली. याशिवाय, तीन हजार रुपये पिडितेला देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.