परिवहनचे सहा सदस्य होणार निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:56 IST2021-02-26T04:56:25+5:302021-02-26T04:56:25+5:30

कल्याण : नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात आल्याने तसेच केडीएमसीची निवडणूक लांबणीवर पडल्याने सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. यात ...

Six members of the transport will retire | परिवहनचे सहा सदस्य होणार निवृत्त

परिवहनचे सहा सदस्य होणार निवृत्त

कल्याण : नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात आल्याने तसेच केडीएमसीची निवडणूक लांबणीवर पडल्याने सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. यात महापालिकेतील परिवहन समिती वगळता अन्य सर्व समित्या बरखास्त झाल्या आहेत. दरम्यान, रविवारी परिवहन समितीमधील सहा सदस्य निवृत्त होत आहेत. या सदस्यांची निवड महासभेत नगरसेवकांकडून केली जाते. त्यामुळे नगरसेवकांविना नव्या सदस्यांच्या निवडीलाही आता ब्रेक लागणार आहे.

महापालिकेतील नगरसेवकांच्या निवृत्तीमुळे स्थायी, शिक्षण, वृक्ष प्राधिकरण आणि महिला बालकल्याण समिती संपुष्टात आल्या आहेत. परंतु, नगरसेवकांचा सहभाग नसलेली परिवहन समिती मात्र अद्याप अस्तित्वात आहे. परिवहन समितीत १३ सदस्य असतात. परंतु, स्थायी समितीचा सभापती हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. मात्र, नगरसेवकांची मुदत संपल्याने स्थायी समिती सभापतीपद रिक्त झाले आहे. तर, समितीमधील एका सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने ते पदही रिक्त आहे, अशी दोन पदे सद्यस्थितीला रिक्त आहेत.

त्यातच आता रविवारी परिवहन समितीमधील सहा सदस्यही विहीत कालावधीअंती निवृत्त होत आहेत. यात विद्यमान सभापती मनोज चौधरीही आहेत. परिवहन सदस्यांची निवड महासभेत नगरसेवकांकडून केली जाते. परंतु, सद्यस्थिती पाहता नगरसेवकांविना निवृत्त होणाऱ्या सदस्यांची रिक्त पदे भरण्याबाबत पेच उभा राहिला आहे.

विधी विभागाकडून मागवली माहिती

नगरसेवक जोपर्यंत निवडून येत नाही, तोपर्यंत परिवहन समितीमधील सहा सदस्यांची पदे रिक्त ठेवायला लागतील, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. तर, नव्या सदस्यांच्या निवडीबाबत उभ्या राहिलेल्या पेचाबाबत विधी विभागाकडून मार्गदर्शन मागविल्याची माहिती मनपा सचिव संजय जाधव यांनी दिली.

-------------------------

Web Title: Six members of the transport will retire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.