उल्हासनगर भाजपात सिंधी-मराठी वाद
By Admin | Updated: April 24, 2017 02:18 IST2017-04-24T02:18:52+5:302017-04-24T02:18:52+5:30
महासभेत पाणीप्रश्नावरून भाजपा नगरसेवक राजेश वानखडे यांनी खडे बोल सुनावले. याप्रकाराने भाजपातील वाद चव्हाट्यावर आला

उल्हासनगर भाजपात सिंधी-मराठी वाद
उल्हासनगर : महासभेत पाणीप्रश्नावरून भाजपा नगरसेवक राजेश वानखडे यांनी खडे बोल सुनावले. याप्रकाराने भाजपातील वाद चव्हाट्यावर आला असून वादाला सिंधी-मराठी वादाची किनार असल्याचे बोलले जात आहे. भाजपा, ओमी टीम व साई पक्षाने मराठी नगरसेवकांना मानाचे पद दिले नाही. सर्व पदे आपापसांत वाटून घेतल्याची भावना मराठी नगरसेवकांची झाली आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपाचे (ओमी टीमसह) ३२, साई पक्षाचे ११ व रासपचा १ असे नगरसेवक निवडून आले आहेत. सत्ताधारी भाजपातील एकूण ४४ नगरसेवकांपैकी १३ नगरसेवक मराठी आहेत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सदस्यांसह सभापती अशी महत्त्वाची पदे सिंधी नगरसेवकांनी वाटून घेतली. याचा राग मराठी नगरसेवकांना आला असून त्यांची कोंडी वानखडे यांच्या रूपाने बाहेर पडली आहे. त्यांनी अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातून भाजपाच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक लढवली होती. केवळ १८०० मतांनी त्यांचा पराभव झाला होता. सलग तिसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आले आहेत.
प्रभाग क्रमांक १८ मधील सुभाष टेकडी परिसरात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. मराठी नगरसेवकांना स्थानिक भाजपा कोअर कमिटीतील नेते डावलत असल्याचे चित्र आहे. पाण्यासाठी नाइलाजास्तव शिवसेनेच्या मांडीलामांडी लावून विरोध करण्यासाठी बसावे लागल्याची प्रतिक्रिया नगरसेवक वानखडे यांनी दिली. (प्रतिनिधी)