नोटाबदलीचा साधा सोपा फॉर्म्युला
By Admin | Updated: December 29, 2016 02:34 IST2016-12-29T02:34:36+5:302016-12-29T02:34:36+5:30
आपली रोजची गरज काय असते? दूध, भाजी आणि इतर काही छोट्या-मोठ्या गोष्टी. पण यासाठी बँकेत आपण पैसे काढण्यासाठी तासन्तास उभे राहतो. त्यापेक्षा यावर

नोटाबदलीचा साधा सोपा फॉर्म्युला
ठाणे : आपली रोजची गरज काय असते? दूध, भाजी आणि इतर काही छोट्या-मोठ्या गोष्टी. पण यासाठी बँकेत आपण पैसे काढण्यासाठी तासन्तास उभे राहतो. त्यापेक्षा यावर काही सोपा मार्ग काढता येऊ शकतो का? असा विचार ठाण्यातील एका ६७वर्षीय वृद्धाने केला आणि यातून त्यांनी एक साधा सरळ फॉर्म्युला शोधून काढला.
एखाद्या किराणा मालाच्या दुकानात जाऊन सामान घेतल्यानंतर किंवा मॉलमध्ये जरी सामान घेतले आणि त्या ठिकाणी ३०० रुपयांचे बिल झाले असेल तर ३५०चे बिल देऊन त्यांच्याकडून ५० रुपये परत घ्यावेत ज्यामुळे बँकेच्या रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचेल. हा फॉर्म्युला आत्मसात केला किंवा नागरिकांना त्या दृष्टीने मदत केली तर याचा नक्कीच फायदा दोघांनाही होईल असा विश्वास या वृद्धाने व्यक्त केला आहे.
ठाण्यातील वृंदावन येथील दिलीप करकरे (६७) या वृद्धाने हा फॉर्म्युला शोधून काढला आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एका दुकानातून स्वॅप करून औषधे घेतली होती. परंतु त्यांना सुट्या पैशांची चणचण होती, त्या वेळेस त्यांनी दुकानदाराकडे जास्तीचे पैसे स्वॅप करून शिल्लक राहिलेली रक्कम त्यांच्याकडून घेतली.
हाच अनुभव गाठीशी असल्याचा फायदा झाल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आपली रोजची गरज ती केवढी असते? बुट पॉलीश, दूध, भाजी आणि इतर काही खाण्याचे पदार्थ आपण विकत घेत असतो. परंतु काही ठिकाणी कार्ड स्वॅप करण्याची सुविधा असते तर काही ठिकाणी ही सुविधा उपलब्ध नसते. त्यात आता नोटाबंदीमुळे या वस्तू घ्यायच्या कशा, असा प्रश्न पडलेला आहे. कारण दुकानदारदेखील सुटे पैसे देणार कुठून? त्यामुळे सगळ्यांचे वांदे झाले आहेत. परंतु मी जी क्लृप्ती वापरली त्याचा मला खूप फायदा झाला आहे. या नव्या कल्पनेमुळे दुकानदाराबरोबर आपलाही फायदा होतो. दुकानदाराला त्याचे पैसे कार्डद्वारे मिळतात आणि आपल्याला पैसे सुटे करण्यासाठी बँकेत जाण्याची किंवा सुट्या पैशांसाठी एटीएमबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहण्याची वेळ येत नाही. (प्रतिनिधी)
- विशेष म्हणजे करकरे यांनी जुन्या नोटा बंद झाल्या तेव्हा घरातील सुटे पैसे शोधण्यास सुरुवात केली असता त्यांना त्याच्या घरात हजोरा रुपये सापडले. परंतु त्यांनी या सुट्या पैशांचा वापर केवळ स्वत:साठी न करता आपल्या मित्रमंडळी आणि गरजूंनादेखील त्या पैशाचे वाटप केले.