ठाण्यात आजपासून उघडले दुकानाचे शटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST2021-06-01T04:30:35+5:302021-06-01T04:30:35+5:30
ठाणे : राज्य शासनाने ज्या शहरांमधील रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांपेक्षा कमी असेल तेथे दुकाने सुरू ठेवण्याबाबत निर्णयाचे अधिकार ...

ठाण्यात आजपासून उघडले दुकानाचे शटर
ठाणे : राज्य शासनाने ज्या शहरांमधील रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांपेक्षा कमी असेल तेथे दुकाने सुरू ठेवण्याबाबत निर्णयाचे अधिकार महापालिकांना दिल्याने ठाणे महापालिकेने उद्या (मंगळवार) १ जूनपासून मॉल, शॉपिंग सेंटर वगळता इतर आस्थापना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता कपडे, पावसाळी बूट-चपला, दागिने खरेदी करता येतील. वाढलेली दाढी व केस कापणे शक्य होणार आहे, परंतु शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्यात येतील. हॉटेलमधील केवळ पार्सल सेवा सुरु राहील.
ठाणे महापालिका हद्दीत मागील आठवड्यापासून रुग्णवाढीचा दर हा ७.८५ टक्क्यांच्या आसपास आहे. ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु होती, परंतु आता त्या दुकानांसोबतच उद्या १ जूनपासून कपडे, भाजी, ज्वेलर्स, सलून आदींसह इतर आस्थापना सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु राहणार आहेत. त्याची अंमलबजावणी १ जूनपासून केली जाणार आहे, परंतु मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स सुरु राहणार नाहीत. हॉटेल सुरु राहतील परंतु त्यांनाही दुपारी दोन वाजेपर्यंत पार्सलची सुविधा असणार आहे. दुपारी २ नंतर केवळ औषधांची दुकाने सुरु राहणार आहेत. शासकीय कार्यालयातील उपस्थिती ही २५ टक्के असणार आहे. कृषी विषयक दुकाने सातही दिवस खुली राहणार आहेत.
...........
रुग्ण घटले, दुकाने उघडली
ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसांपासून रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. महापालिका हद्दीत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १५९५ आहे. रुग्णवाढीचा वेग हा ७.८५ टक्के एवढा आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी हा ६९२ दिवसांवर गेला आहे. उपलब्ध ५४४८ खाटांपैकी केवळ ८६५ खाटा वापरात असून उर्वरित ४ हजार ५८३ खाटा रिक्त आहेत. याचाच अर्थ सध्याच्या घडीला ८४ टक्के खाटा रिकाम्या आहेत. ऑक्सिजनच्या एकूण २९१० खाटांपैकी ४३१ खाटा वापरात असून २ हजार ४७९ खाटा रिकाम्या आहेत. ८५ टक्के ऑक्सिजनच्या खाटा रिकाम्या आहेत. तर आयसीयूच्या १०९२ खाटांपैकी २५४ खाटा वापरात असून ८३८ खाटा रिक्त आहेत. म्हणजेच ७७ टक्के खाटा शिल्लक आहेत. याशिवाय व्हेंटिलेटरच्या ३४२ खाटांपैकी ७८ खाटा वापरात असून २६४ म्हणजे ७७ खाटा रिकाम्या आहेत.
........